आयुक्तांची बदली होताच फेरीवाले जैसे थे
By admin | Published: April 3, 2017 03:21 AM2017-04-03T03:21:45+5:302017-04-03T03:21:45+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होताच, शहरातील पदपथ पुन्हा गजबजू लागले आहेत.
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होताच, शहरातील पदपथ पुन्हा गजबजू लागले आहेत. फेरीवाल्यांनी आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. बहुतांशी विभागात मोकळे झालेल्या पदपथांवर फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याचे दिसून येते. नवी मुंबईसह पनवेल महापालिका क्षेत्रातही हीच परिस्थिती पाहावयास मिळते.
महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची गेल्या आठवड्यात उचलबांगडी करण्यात आली. त्याअगोदर पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचीही बदली करण्यात आली. मुंंढे यांनी आपल्या आयुक्तपदाच्या ९ महिन्यांच्या कार्यकाळात अतिक्रमणांच्या विरोधात कठोर निर्णय घेतले. विशेषत: पदपथांवरील फेरीवाल्यांच्या अनधिकृत बाजाराला चाप लावला. त्यामुळे शहरातील बहुतांशी पदपथांनी मोकळा श्वास घेतला. त्यांच्या या कार्याला नवी मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. वाहतूककोंडीची समस्या काही प्रमाणात दूर झाली. मात्र, गेल्या आठवड्यात मुंढे यांची अचानक बदली झाल्याने फेरीवाले आता पुन्हा मोकाट सुटले आहेत.
शहरातील प्रमुख पदपथांवर त्यांनी पुन्हा कब्जा केला आहे. विशेषत: वाशी सेक्टर ९, १0, सेक्टर १५मध्ये फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. तसेच कोपरखैरणेतील सेक्टर १५ ते १८, सेक्टर ५ ते ८ आणि सेक्टर १ ते ४ या विभागातील बहुतांशी पदपथ व अंतर्गत रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याचे दिसून येते. घणसोलीत रेल्वे स्टेशन रोड, घरोंदा येथील शनिमंदिर, सिम्प्लेक्स येथील रस्ते व पदपथ, घणसोली गावातील दगडू पाटील चौक, घणसोली प्रवेशद्वार आदी ठिकाणी फेरीवाल्यांनी पुन्हा उच्छाद मांडलाय.
फेरीवाल्यांना अर्थपूर्ण अभय
महापालिका विभाग कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फेरीवाल्यांना अर्थपूर्ण पाठिंबा असतो. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही या फेरीवाल्यांना अप्रत्यक्षरीत्या अभय मिळते. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे फेरीवाल्यांसह त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अभय देणाऱ्या घटकांनी धसका घेतला होता; परंतु आता मुंढे यांचीच बदली झाल्याने फेरीवाल्यांसह त्यांच्याकडून मिळणाऱ्या चिरीमिरीवर समाधान मानणाऱ्या संबंधित घटकांचे पुन्हा फावल्याचे दिसून येते.
>पनवेलमध्येही फेरीवाल्यांचे रस्त्यावर पुन्हा बस्तान
पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सुधाकर शिंदे यांनीही सर्वप्रथम पदपथ व रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्याकडे आपला मोर्चा वळविला होता. त्यांच्या बेधडक कारवाईमुळे पनवेलसह कळंबोली, कामोठे, खारघर येथील पदपथांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी त्यांची बदली झाल्याने फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथ व मोकळ्या जागांवर बस्तान ठोकल्याचे दिसून आले आहे. तसेच व्यापाऱ्यांची मार्जिनल स्पेसवर पुन्हा अतिक्रमण करायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे डॉ. शिंदे यांच्या कारवाईचा फेरीवाले व अतिक्रमण करणाऱ्यांनी धसका घेतला होता.त्यामुळे मार्जिनल स्पेस मोकळे झाले होते. बेकायदा हातगाडी व ठेलेवाले परागंदा झाले होते. मात्र, त्यांची बदली होताच महापालिका क्षेत्रात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात शहरातील तब्बल १६ हजार जाहिरात फलक काढून टाकले होते; परंतु मागील काही दिवसांत ठिकठिकाणी पुन्हा हे फलक झळकताना दिसत आहेत. डॉ. सुधाकर शिंदे याना पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी परत बोलवावे या मागणीसाठी पुन्हा आणण्यासाठी रहिवाशांनी तीव्र आंदोलन उभारले आहे. पनवेल महानगरपालिका संघर्ष समिती ही संघटना सक्रिय झाली आहे. तसेच विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम काढण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. शिंदे यांच्या जागेवर आलेले नवीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे फेरीवाल्यांच्या आतिक्रमणासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.