एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 08:39 AM2024-02-25T08:39:38+5:302024-02-25T09:27:13+5:30
संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.
ठाणे - Shrikant Shinde Interview ( Marathi News ) मी ठाण्याला घरी होतो, मतदारसंघात फिरत होतो. सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांना विश्वास देण्याचं काम करत होतो. मूळात एकनाथ शिंदे जाणार हे मला माहिती नव्हते. १९ जूनला आमदारांसोबत साहेब गेले तेव्हा मलाही माहिती नव्हते असं सांगत खासदार श्रीकांत शिंदेंनी घटनाक्रम सांगितला.
ठाण्यातील युवासेनेच्या कार्यक्रमात गायक अवधूत गुप्ते यांनी श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेतली. त्यात ते म्हणाले की, मी न्यूजमध्ये पाहिले तेव्हा घटनाक्रम कळाले. मला खासदार हेमंत गोडसेंचा फोन आला. एकनाथ शिंदे सूरतला गेलेत. मी म्हटलं कुठे चेष्टा करताय, मी कामात आहे. पण ते बोलले न्यूज बघा, मी न्यूज चॅनेल सुरू केला. तेव्हा हे कळाले. एकनाथ शिंदे प्लॅनिंग करून गेले नव्हते. त्यांच्यासोबत ज्या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला आणि जो निर्णय घेतला त्याला शेवटापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले असं त्यांनी म्हटलं.
तसेच मी रोज भेटायचो, पण आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हते. एकनाथ शिंदे यांनी रिस्क घेतली होती. त्यांच्यावर विश्वास ठेऊन आमदार, मंत्री त्यांच्यासोबत गेले. हे जर घडले नाही तर पुढे काय होईल हे माहिती नव्हते. मुलगा म्हणून मला टेन्शन आलं होते. वडिलांची काळजी होती. कुटुंबातील लोक, सहकारी सगळ्यांना उद्या काय होणार हे कळत नव्हते. गेले अनेक वर्ष रिस्क घेऊन ते शिवसेना वाढवत होते. तशीच बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी शिंदेंनी रिस्क घेतली आणि आज आपण पाहतोय, मुख्यमंत्रिपदाला १०० टक्के न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत असं श्रीकांत शिंदेंनी सांगितले.
दरम्यान, गेल्यावेळी एकाला मंत्री करण्यासाठी किती तडजोडी केल्या गेल्या. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काबील होगा वही राजा बनेगा असं मी म्हणतो. सर्वोच्च पद हे कुणासाठी राखीव नसते. जो मेहनत करेल, पक्षाला वेळ देईल, लोकांचा विश्वास जिंकेल अशा युवकांना त्यापदावर पोहचवण्याचं काम आम्हाला करायचे आहे. पूर्वी सर्वोच्च पद २ जणांसाठी राखीव होती. आता ती परिस्थिती नाही.आज पक्षात कुठलेही पद राखीव नाही. पक्षात लाभाचे पद मी कधी घेणार नाही. आमच्यावर विश्वास ठेऊन जे आलेत त्यांना ती संधी आहे. वेगवेगळ्या युवकांना संधी मिळाली तर पक्ष घराघरात पोहचू शकतो असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टीका केली.
अपघाताने राजकारणात आलो
मी राजकारणात अपघाताने आलोय, मला राजकारणात रस नव्हता. पक्षाला गरज होती तेव्हा मी आलो. २०१४ मध्ये मला कल्याण लोकसभेतून उमेदवारी दिली. आज मी डॉक्टर आहे, राजकारणाच्या माध्यमातून मी फाऊंडेशनचं काम करतो. हजारो रुग्णांची सेवा करण्याचं काम केले जाते. कल्याणमध्ये आपला उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला होता. त्यावेळी पक्षाने मला तिथे उभे केले. तिथे अडीच लाखाच्या फरकाने निवडून आलो. त्यानंतर कल्याण मतदारसंघात मी काम करत राहिलो. २०१९ ला ३ लाखांच्या फरकाने निवडून आलो असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं.
आदित्य ठाकरेंवर पलटवार
आव्हान कोणाचं स्वीकारायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण आव्हान कोण करतंय हे पाहावे लागेल. प्रत्येकाचं आव्हान स्वीकारत बसले तर उत्तर देण्यात वेळ जाईल. एकनाथ शिंदे पुढे काम करत जातायेत, मागे कोण काय बोलतंय याकडे लक्ष देत नाही. जे टीका करतायेत, त्यांची योग्यता काय, बोलतोय काय हे कळत नाही. संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.