तर खासदार जलील यांनी सुद्धा केलं होत गडकरींच कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 05:34 PM2019-11-05T17:34:46+5:302019-11-05T17:37:21+5:30
नितीन गडकरी मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे सुरु झाली आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री पदासाठी रोज नवनवीन नावे चर्चेत येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर गडकरी यांचे काम पाहता ते राज्याची जवाबदारी खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात असेही बोलले जात आहे. त्यानिमित्ताने खासदार इम्तियाज जलील यांनी संसदीय अधिवेशनात नितीन गडकरी यांच्या कामाचे केलेल्या कौतुकाची पुन्हा चर्चा पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन 12 दिवस उलटली असताना सुद्धा सत्तास्थापनेचा तिढा मात्र काही सुटू शकला नाही. त्यातच मुख्यमंत्रीपदासाठी रोज नवनवीन नावाची चर्चा सुरु आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
त्यातच नितीन गडकरी असोत की देवेंद्र फडणवीस दोघे आमच्यासाठी सारखेच आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे नितीन गडकरी मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे सुरु झाली आहेत. तर गडकरी हे प्रभावशाली मंत्री असून विरोधक सुद्धा त्यांच्या कामांचे कौतुक करतात हे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यानिमित्ताने जलील यांनी संसदेत गडकरी यांचे केलेल्या कौतुकाची पुन्हा चर्चा होत आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाकडून मोटार वाहन कायदा दुरूस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आले असताना खासदार इम्तियाज जलील यांनी त्या चर्चेत सहभाग नोंदवतांना गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले होते. केंद्रीय मंत्री म्हणून देशात सर्वात चांगले काम जर कुणी करत असेल तर ते नितीन गडकरी आहेत. मी विरोधी पक्षाचा खासदार असलो तरी त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही असे सुद्धा जलील म्हणाले होते. मुख्यमंत्रीपदासाठी गडकरी यांचे नाव पुढे आले असताना या गोष्टीची चर्चा पाहायला मिळत आहे.