धक्कादायक! गॅस संपल्यानं मृतदेह अर्धवटच जळाला; तब्बल ३ दिवसांनी पुन्हा अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:26 PM2021-09-08T19:26:35+5:302021-09-08T19:29:04+5:30
भाईंदरच्या स्मशान भूमीत गॅस संपल्याने मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याची घटना
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनीतील गॅस संपल्या कारणाने अर्धवट जळालेल्या मृतदेहावर तब्बल तीन दिवसांनी पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एरव्ही करदात्या जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेवर टीकेची झोड उठू लागली आहे.
भाईंदर पश्चिमेस भोला नगर भागात महापालिकेची स्मशानभूमी आहे. पश्चिम भागातील ही एकमेव स्मशानभूमी असून येथे गॅस वरील शवदाहिनीत तसेच लाकडांच्या द्वारे अंत्यविधी केले जातात. पर्यावरणचा ऱ्हास व प्रदूषण टाळण्याचा समाजहिताचा विचार करणारे नागरिक आपल्या नातलगाचे अंत्यसंस्कार गॅस वरील शव दाहिनीत करण्यास प्राधान्य देतात. शिवाय अपघाती मृत्यू, बेवारस मृतदेहावर गॅस वरील शव दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. कोरोना संसर्ग मुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यविधी सुद्धा प्रामुख्याने गॅस दाहिनीत मोठ्या संख्येने करण्यात आले. त्यामुळे सदर गॅस वहिनीच्या देखभाल दुरुस्ती सह गॅस पुरवठ्या कडे महापालिका आणि नगरसेवक, पदाधिकारी यांनी वेळोवेळी लक्ष देणे, आढावा घेणे आवश्यक होते.
परंतु गेल्या शनिवारी रात्रीच्या वेळी सदर पालिका स्मशानभुमीत गॅस दाहिनीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असताना गॅसच संपला. त्यामुळे दहनविधी पूर्ण झाला नाही. आतील यांत्रिक शेगडीत मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच राहिला. त्यापेक्षा आणखी संतापजनक बाब म्हणजे गॅस सिलेंडर तातडीने उपलब्ध तर केले गेले नाहीच पण गॅस उपलब्ध करून देण्यासाठी चक्क मंगळवार उजाडला. तीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्या नंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर गॅस दाहिनीत पूर्णपणे अंत्यसंस्कार उरकले गेले. तीन दिवस तो अर्धवट जळालेला मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता.
ही अतिशय लाजिरवाणी पण संतापजनक अशी घटना आहे. पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांना स्वतःची दालने जनतेच्या पैशातून आलिशान करण्याचे, वाहन आदी भत्ते साठी कोटयावधी रुपये उधळण्याचे तेवढे कळते. जिवंत असताना पालिका आवश्यक सुखसुविधा देत नाही व सुखासुखी जगू देत नाही. आता मृत्यू नंतर सुद्धा विटंबना करत आहे. हे नेहमीचे प्रकार घडत आहेत.- मिलन म्हात्रे, माजी नगरसेवक
गॅस संपल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने लगेच कळवले पाहिजे होते. गॅस नव्हता तर लाकडांचा वापर करता आला असता. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल - दीपक खांबीत, कार्यकारी अभियंता