...जेव्हा दहशतवादी म्हणून होमगार्ड पकडला जातो
By admin | Published: July 27, 2015 07:31 PM2015-07-27T19:31:58+5:302015-07-27T20:21:32+5:30
पंजाबमधील गुरदासपूर येथे दहशतवाद्यांच्या चकमकीदरम्यान झाडात लपून बसलेला होमगार्ड सुरक्षा यंत्रणांच्या तावडीत सापडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
ऑनलाइन लोकमत
गुरदासपूर, दि. २७ - पंजाबमधील गुरदासपूर येथे दहशतवाद्यांच्या चकमकीदरम्यान झाडात लपून बसलेला होमगार्ड सुरक्षा यंत्रणांच्या तावडीत सापडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत घाबरलेल्या स्थितीत असलेला हा होमर्गाड सुरुवातीला काही बोलत नसल्याने संभ्रम कायम होता. अखेर काही वेळाने त्याची ओळख पटली व सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याची रवानगी रुग्णालयात केली.
गुरदासपूर येथील दिनानगर पोलिस ठाण्यावर सोमवारी सकाळी सैन्याच्या वेशात आलेल्या तिघा दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच पोलिस व तीन नागरीक मृत्यूमुखी पडले. तब्बल १० तास दहशतवादी व सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीदरम्यान दिनानगर पोलिस ठाण्यात ड्रायव्हर म्हणून काम करणारे होमगार्ड जैसल सिंह हे झाडामागे लपून बसले होते. चकमकीदरम्यान शोधमोहीम सुरु असताना जैसल सिंह दिसले. सुरुवातीला जैसल सिंह हे दहशतवादीच आहेत की काय असा प्रश्न सुरक्षा दलाच्या जवानांना पडला होता. त्यांनी जैसल सिंह यांची चौकशी केली पण ते काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर काही वेळाने जैसल सिंह यांची ओळख पटली व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चकमक सुरु होताच जैसल सिंह हे झाडामागे जाऊन लपले असावे असा अंदाज आहे.