"शाळेत असताना मी गणित, मराठीत टॉपर होतो, शिक्षकही माझ्याकडून माहिती घेऊन शिकवायचे’’, नारायण राणेंनी जागवल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 05:20 PM2023-01-22T17:20:25+5:302023-01-22T17:21:00+5:30
Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका शाळेतील मुलांना संबोधित करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी बालपणी केलेला संघर्ष, अभ्यासाबाबच्या आवडीच्या आठवणी सांगितल्या.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका शाळेतील मुलांना संबोधित करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी बालपणी केलेला संघर्ष, अभ्यासाबाबच्या आवडीच्या आठवणी सांगितल्या. मी शाळेत असताना गणित आणि मराठी या विषयात टॉपर होतो. तेव्हा गणिताच्या शिक्षिका माझ्याकडून गणितांचा संग्रह घेऊन नंतर वर्गात तो धडा शिकवायच्या, अशी आठवण नारायण राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील कासार्डे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले की, शाळेत असताना मी गणित आणि मराठी या विषयात टॉपर होतो. तेव्हा मी मराठीमध्ये पाचही डिव्हिजनमधून पहिलायेत असे. शाळेत पाचवी-सहावीमध्ये असताना मी गणितांचा संग्रह केला होता. त्यामुळे गणिताच्या शिक्षिका मला घरी बोलावून गणिताच्या संग्रहाबाबत माझ्याकडून जाणून घेत असत. तसेच नंतर वर्गात शिकवत असत. त्याचं कारण म्हणजे तो धडा वर्गात शिकवण्यापूर्वीच मी दोन पायऱ्या पुढे असे, असे नारायण राणे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, बुद्धिमत्ता, वैचारिक ताकद आणि नशीब यामुळे मी मोठा झालो. मला मिळालेल्या यशामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा वाटा मोठा आहे. त्यांनी मला घडवले. परिपक्व बनवले. त्यामुळेच मी उद्योग-व्यवसाय आणि राजकारणामध्ये यशस्वी झालो, असेही नारायण राणे म्हणाले.
आपल्याला जीवनात मिळालेल्या यशाचे गुपित सांगताना नारायण राणे म्हणाले की, माझ्या यशामध्ये खडतर प्रयत्नांचा वाटा आहे. सोबतच मी चांगले ते स्वीकारत गेलो. चांगले मित्र आणि माणसे जोडत गेलो. निर्व्यसनीपणा माझ्या यशाचे सातत्य टिकवण्यात उपयुक्त ठरला. मी माझ्यातील विद्यार्थी मरू दिला नाही. मी चांगल्या माणसांकडून शिकत गेलो. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी आणि वाचनासाठी नेहमी वेळ काढला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनतीला आणि परिश्रमांना पर्याय नाही, ते तुम्हाला करावेच लागतील, असा सल्लाही नारायण राणे यांनी दिला.