“लाठीचार्ज झाला की पळणारे आणि म्हणे…”; जुना फोटो शेअर करत शिवसेना आमदाराची फडणवीसांवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:42 AM2022-05-03T10:42:02+5:302022-05-03T10:49:00+5:30
राज्यात हनुमान चालीसा आणि भोंगा वादानंतर आता अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यावरुन नवीन वाद सुरू झाला आहे.
औरंगाबाद: राज्यात हनुमान चालीसा आणि भोंगा वादानंतर आता अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यावरुन नवीन वाद सुरू झाला आहे. बाबरी पाडली तेव्हा आमच्या नेत्यांसह मी स्वतः तिथे होतो, शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. त्यावर आता शिवसेनेच्या आमदाराने बोचरी टीका केली आहे.
औरंगाबादचे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देवेंद्र फडणवीसांचा काही वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी पाडायला गेला होता," अशा कॅप्शनसह दानवेंनी एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे पळताना दिसत आहेत. दरम्यान, हा फोटो नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेलं नाही.
काय म्हणाले होते फडणवीस?
मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राममंदिर आंदोलनामधील शिवसेनेच्या सहभागासंदर्भात प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. तसेच, बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो, बदायूच्या सेंट्रल जेलमध्येही मी 18 दिवस काढले. त्यावेळेस शिवसेना कुठेच नव्हती. नुसते मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली," अशी टीका फडणवीसांनी केली होती.