महादेव जानकरांना कुत्रा चावतो तेव्हा...
By admin | Published: April 4, 2015 04:36 AM2015-04-04T04:36:30+5:302015-04-04T04:36:30+5:30
गोरेगावच्या नागरी निवारा परिसरात गुरुवारी आमदार महादेव जानकर यांना कुत्रा चावला आणि त्यासाठीच्या इंजेक्शनसाठी त्यांना वणवण भटकावे लागले.
मुंबई : गोरेगावच्या नागरी निवारा परिसरात गुरुवारी आमदार महादेव जानकर यांना कुत्रा चावला आणि त्यासाठीच्या इंजेक्शनसाठी त्यांना वणवण भटकावे लागले. देशात अॅन्टी रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांना अमेरिकेशी संपर्क साधावा लागला. तीन दिवसांनंतर ते पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर चर्चाही झाली होती.
आ. जानकर घरी परतत असताना एका व्यक्तीवर सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला केल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. तेव्हा एका कुत्र्याने त्यांच्या मांडीला जोरदार चावा घेतला. कुत्र्याचे चार दात त्यांच्या मांडीमध्ये रुतल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यांना गोरेगावच्या वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे एन्टी रेबीजच्या औषधांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी याच परिसरातील पठारे रुग्णालय गाठले. जिथे सुरक्षारक्षक आणि केमिस्ट दोघे दारू पिऊन तर्राट झालेले आढळले, असे जानकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कार्यकर्त्यांनी जसलोक, नानावटी, लीलावती, नॅशनल अशा बड्या रुग्णालयांमध्ये इंजेक्शनबाबत चौकशी केली. चेन्नईमध्ये अपोलो रुग्णालयात फोन केला. तेव्हा शेवटचे एक इंजेक्शन आत्ताच संपले, असे सांगण्यात आले. अख्ख्या देशभरात हे इंजेक्शन उपलब्ध नसून आम्ही अमेरिकेतून तुमच्यासाठी इंजेक्शनची सोय करतो, असे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर कांदिवलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)