मोदी मुंबईत केव्हा येतात, त्याचीच वाट पाहतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2017 05:35 AM2017-02-07T05:35:54+5:302017-02-07T05:35:54+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा सध्या सुरु आहेत. गिरगावसह भांडुप आणि मुलुंड येथील सभांत भाजपावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा सध्या सुरु आहेत. गिरगावसह भांडुप आणि मुलुंड येथील सभांत भाजपावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सोमवारी चांदिवली येथील सभेत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई मोदींची सभा कधी होतेय, याची आपण वाट पाहत असल्याचे ते म्हणाले. त्या सभेनंतर मुंबई शिवसेनेचा होणारा विजय मला पाहायचाय, असे म्हणत त्यांनी भाजपाला जोरदार आव्हान दिले. आता भाजपा उद्धव यांना काय उत्तर देणार? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चांदिवलीत विशाल समुदायाला संबोधताना म्हणाले उद्धव म्हणाले, गेल्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, मुंबईत शिवसेना राहणार नाही, पण शिवसेना आहे तिथेच आहे, उलट ती अधिक फोफावलीय. प्रचारासाठी धावून येणारे कोण आणि मुंबईकरांसाठी धावून येणारे कोण, याचा विचार करा. मुंबईकरांना शिवसेना पाहिजे भाडोत्री माणसे नकोत. इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले मात्र अद्याप वीटही लागलेली नाही. हुतात्मा स्मारकाजवळ शपथ घ्यायची असेल तर ती संयुक्त महाराष्ट्राची शपथ घ्या, पारदर्शकतेची कसली घेता? असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. तीर्थप्रसाद म्हणून मुंबई मिळालेली नाही, त्यासाठी लढा द्यावा लागला. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा तुकडा पडू देणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.
मुंबईसाठी ही आमची तिसरी-चौथी पिढी कार्यरत आहे, असे म्हणत उद्धव यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रक्षणाची शपथ घ्या, असे आवाहन शिवसैनिकांना केले. महापालिका आपण
जिंकणारच आहोत त्यात मला काही शंका नाही, असा विश्वास व्यक्त करत उद्धव यांनी राज्य सरकारसाठी शिवसेनेचा टेकू तुम्हाला लागतो, तरी मुंबई महापालिका गिळायला का निघालात, याचे उत्तर
मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे थेट आव्हानही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)