२०१४ मध्ये मोदी जिंकले तेव्हा शिवसेनेनेही म्हटले होते ‘देश पुन्हा स्वतंत्र झाला’ भाजपाने थेट पुरावाच दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 08:12 PM2021-11-18T20:12:57+5:302021-11-18T20:14:57+5:30
Shiv Sena-BJP Politics: स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून शिवसेना नेते Sanjay Raut यांनीही Kangana Ranaut आणि Vikram Gokhale यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता या वादात BJPनेही उडी घेतली असून, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर Saamana दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे.
मुंबई - कंगना राणौतने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. १९४७ रोजी मिळाली ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य तर २०१४ रोजी मिळाले, असे विधान कंगनाने केले होते. त्यानंतर या विधानाला विक्रम गोखलेंसारख्या ज्येष्ठ कलावंतांनी पाठिंबा दिल्याने प्रकरण अधिकच चिघळले. तेव्हापासून कंगना आणि विक्रम गोखलेंवर टीका सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या विधानांवरून कंगना आणि विक्रम गोखलेंना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता या वादात भाजपानेही उडी घेतली असून, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सामना दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे.
भाजपाचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात सामना वृत्तपत्राचा एक फोटो शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशात स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला होता. दरम्यान, महाराष्ट्रामध्येही शिवसेना भाजपा महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले होते. त्यात शिवसेनेला १८ तर भाजपाला २३ जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, त्या विजयाचा आनंद व्यक्त करताना दुसऱ्या दिवशी सामनाच्या मुख्य बातमीचे शीर्षक हिंदुस्थान काँग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!! असे दिले होते. हेच कात्रण आता भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे. आता याला शिवसेना काय प्रत्युत्तर देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आता बोला... pic.twitter.com/zc0UK86gxh
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 18, 2021
दरम्यान, संजय राऊत यांनी स्वातंत्र्यावरून केलेल्या विधानावरून कंगना राणौतवर जोरदार टीका केली होती. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.