जालन्यातील सीड्स पार्कला मुहूर्त कधी?, तेलंगणा, आंध्रकडून मात्र रेड कार्पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:23 AM2021-02-17T05:23:32+5:302021-02-17T05:24:13+5:30
Seeds Park : जालन्यातील बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ प्रसिद्ध उद्योजक बद्रीनारायण बारवाले यांनी साधारपणे १९६७ मध्ये महिको कंपनीच्या माध्यमातून रोवली.
- संजय देशमुख
जालना : बियाणांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरात छोट्या कंपन्यांसह शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून चार वर्षांपूर्वी सीड्स पार्क उभारणीची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु नंतर यावर केवळ बैठकांचे सत्र सुरू असून, यावर अद्यापही अंतिम निर्णय न झाल्याने राज्यातील अनेक उद्योजक हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सीड्स पार्ककडे वळत आहेत. तेथे त्यांना रेडकार्पेट अंथरले जात आहे.
जालन्यातील बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ प्रसिद्ध उद्योजक बद्रीनारायण बारवाले यांनी साधारपणे १९६७ मध्ये महिको कंपनीच्या माध्यमातून रोवली. काळाची पावले ओळखून बद्रीनारायण बारवाले यांनी पिकांच्या संशोधनात वेगवेगळे बदल करून जैव तंत्रज्ञानाची कास धरली. त्यांच्या कंपनीने अमेरिकेतील तत्कालीन मॉन्सेटो कंपनीसोबत करार करून साधारणपणे २००० मध्ये बीटी तंत्रज्ञान आणले होते.
या तंत्रज्ञानाने भारताला कापूस उत्पादनात जगातील पहिल्या पाच देशांच्या रांगेत आणून ठेवले. जैव तंत्रज्ञानामुळे बोंड अळीचे उच्चाटन झाल्याचा दावा केला जात आहे. एकूणच एवढा वारसा असतानाही जालन्यातील सीड्स पार्कचे काम हे केवळ बैठका घेण्यावर अडून बसले आहे.
मध्यंतरी नोडल एजन्सी म्हणून महाबीज तसेच एमआयडीसीला नेमले होते. तत्पूर्वी एका खासगी सल्लागार एजन्सीकडून त्याचा प्राथमिक आराखडा तयार केला होता. त्यानुसार सीड्स पार्क उभारणीसाठी जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथे शंभर एकरपेक्षा अधिकची जमीनही संपादित केली. परंतु तेथेही अद्याप काहीच हालचाली नाहीत.
पार्कचा उद्देश काय?
महिकोप्रमाणेच शेजारच्या विदर्भातील अनेक शेतकरी हे बिजोत्पादन करतात. त्यांना अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध व्हावी या हेतूने येथे प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून मोठे कोल्ड स्टोअरेज बांधण्याचे नियोजन आहे. माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणी करणे यासह शेती आणि संबंंधित शेतकऱ्यांना तज्ज्ञ कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून मेळावे घेणे ही कामे करण्यात येणार होती.
बीटी पार्कची अशीच गत
२००३ मध्ये त्यावेळी आणि आता आमदार असलेले कैलास गोरंट्याल यांनी जालन्यातील एमआयडीसीत बीटी पार्क अर्थात जैव तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीसाठी जवळपास ६० एकर जागा राखून ठेवली होती. त्यासाठी महिकोसोबत सामंजस्य करार करण्यात आला. अनेक बी-बियाणे कंपन्या, उद्योजकांनी तेथे जागाही संपादित केल्या. परंतु तेथे ना प्रयोगशाळा उभी राहिली ना बीटी पार्कशी संबंधित कंपन्या आल्या. आज या बीटी पार्कवर मोठी हॉटेल्स, शोरूम उभे राहिल्याचे वास्तव आहे. यासाठी एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून जागेचा ‘पर्पज’ बदलून घेतल्यानेच बीटी पार्क बारगळल्याचे सांगण्यात आले.
उद्योजकांचा तेलंगणाकडे ओढा
बीटी पार्क, सीड्स पार्क लांबणीवर पडले असतानाच तिकडे आंध्र प्रदेश तसेच तेलंगणामध्ये सीड्स पार्क विकसित झाले आहेत. तेथे येणाऱ्या उद्योजकांना पाच वर्षांच्या वीजबिलात सवलत, कुठलाही कर नाही, यासह अन्य सुविधांमुळे जालन्यासह राज्यातील उद्योजक गुंतणवूक व संशोधनाशी संबंधित प्रयोगशाळा तेथे उभारत असल्याचे सूत्रांनी सांगितले.