पाऊस आला तरी नाले तुंबलेलेच!
By admin | Published: June 8, 2017 03:56 AM2017-06-08T03:56:16+5:302017-06-08T03:56:16+5:30
नालेसफाईच्या कामातील फोलपणा बुधवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान उघड झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात केडीएमसीच्या वतीने सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामातील फोलपणा बुधवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान उघड झाला. त्यामुळे काही नाल्यांची सफाई झालेली नाही, अशी कबुलीही महापौरांना द्यावी लागली. तसेच अपूर्णावस्थेतील कामे पाहता त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर दौरा अर्धवट सोडून पुन्हा मुख्यालयाची वाट धरण्याची नामुष्की ओढावली.
पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडून दरवर्षी नाल्यांची सफाई केली जाते. मात्र या सफाईवर सातत्याने टीका होते. पावसाळ््यापूर्वी, पावसाळ््यात आणि पावसाळ््यानंतर अशा तीन टप्प्यांत ही कामे केली जातात. या कामांचे कंत्राट दिली जात असल्याने मे महिन्यापासूनच याबाबतच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होते. सध्या महापालिका क्षेत्रात या नाल्यांची संख्या ८९ च्या आसपास पोहोचली आहे. या नाल्यांमध्ये नागरिक सर्रासपणे कचरा टाकतात. तसेच गटारांमधील गाळ य्ेऊन पडतो. तसेच जलपर्णींच्या विळखा पडत असल्याने पाण्याच्या निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो.
प्रभाग ‘अ’ मध्ये ९, ‘ब’मध्ये ११, ‘क’मध्ये ४ ,‘जे’ मध्ये ८, ‘ड’मध्ये २४, ‘ग’मध्ये ५, ‘ह’मध्ये ८, ‘आय’मध्ये १६ आणि ‘इ’ प्रभागामध्ये १७, असे एकूण ८९ नाले आहेत. याकामासाठी यंदा तीन कोटी ३८ लाख ४८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. मोठ्या नाल्यांच्या सफाईस ११ मे पासून
सुरुवात केली आहे. परंतु, ही कामे पूर्ण झालेली नाहीत.
महापौरांनी या दौऱ्यात कल्याण शहरातील आधारवाडी, संतोषीमात रोड, जरीमरी, कोळसेवाडी, खडेगोळवली इत्यादी पूर्व-पश्चिम नाल्यांची पाहणी केली. त्यात जरीमरी नाल्यात अद्यापही मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाळ साचला असल्याचे निदर्शनास पडले. तसेच खडेगोळवली नाल्याच्या ठिकाणी नाल्यातील गाळ संबंधित कंत्राटदाराने काठावरच काढलेला असल्याचे दिसून आले. हा गाळ तातडीने उचलण्याच्या सूचना देत आठवडाभरात नाले साफाईची कामे पूर्ण करा, अशी तंबी महापौरांनी कार्यकारी अभियंता बबन बरफ यांना दिली. या दौऱ्याप्रसंगी उपमहापौर मोरेश्वर भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, भाजपा गटनेते वरुण पाटील उपस्थित होते.
केडीएमसीच्या नुकत्याच पार झालेल्या महासभेत ७० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, बुधवारच्या पाहणी दौऱ्यात तो पुरता फोल ठरला. महापौर कल्याण-डोंबिवली शहरांतील नालेसफाईची पाहणी करणार होते. परंतु, कल्याणमधील नालेसफाईची अर्धवट झालेली कामे पाहता हा दौरा त्यांना कल्याणमध्येच आटोपता घ्यावा लागला. यासंदर्भात ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता कल्याण पूर्व-पश्चिम भागात दौरा केला. काही ठिकाणी सफाईची कामे बाकी आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. दौरा अर्धवट सोडलेला नाही. डोंबिवलीचा दौरा सोमवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
>ही तर हातसफाई
महापौरांच्या दौऱ्यात नालेसफाईच्या कामांमधील फोलपणा उघड झाला आहे. ही नालेसफाई नसून केवळ हातसफाई आहे. कंत्राटदार पोसले जात असून नालेसफाई अर्धवट स्थितीतच होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही. नालेसफाईच्या कामातील सत्ताधाऱ्यांचे साटेलोटे पाहता अधिकारी त्यांच्या नियंत्रणाखाली नाहीत, त्यांना कंत्राटदारही जुमानत नाहीत. या कामांची चौकशी करण्याची मागणी विरोधीपक्षनेते प्रकाश भोईर यांनी केली.