स्मार्ट शहर साकारताना मूलभूत प्रश्नांवर भर द्या

By admin | Published: March 11, 2016 03:06 AM2016-03-11T03:06:51+5:302016-03-11T03:06:51+5:30

लोकांचे पाणी, वीज, घनकचऱ्याची विल्हेवाट हे मूलभूत महत्त्वाचे प्रश्न तातडीने हाती घेण्याची गरज आहे. चादर, टॉवेलसाठी प्रसिद्ध असलेलं शहर स्मार्ट होण्यासाठी आणखी खूप करायचं आहे.

When raising a smart city, focus on basic questions | स्मार्ट शहर साकारताना मूलभूत प्रश्नांवर भर द्या

स्मार्ट शहर साकारताना मूलभूत प्रश्नांवर भर द्या

Next

सोलापूर : लोकांचे पाणी, वीज, घनकचऱ्याची विल्हेवाट हे मूलभूत महत्त्वाचे प्रश्न तातडीने हाती घेण्याची गरज आहे. चादर, टॉवेलसाठी प्रसिद्ध असलेलं शहर स्मार्ट होण्यासाठी आणखी खूप करायचं आहे. आपण सर्वपक्षीय नगरसेवक आणि जनतेने एकत्रित येऊन स्मार्ट शहर होण्याचं स्वप्न पाहिले आहे. ते निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ आणि राज्याचे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोलापुरात व्यक्त केला.
सोलापूर महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यानिमित्ताने महानगरपालिकेच्या आवारात राजेंद्र दर्डा यांचे आगमन होताच ढोल-ताशाच्या निनाद, फटक्यांची आतषबाजी करीत आणि शिवकालीन तुतारी वाजवून हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी विविध पक्षांचे प्रमुख, मनपा पदाधिकारी आणि नगरेसवकांची अक्षरश: रीघ लागली होती. त्यानंतर महापौर, उपमहापौर, आयुक्त, मनपा पदाधिकारी, विविध पक्षांचे गटनेते यांनी दर्डा यांचे आदबीने स्वागत करीत कार्यक्रमस्थळी नेले.
प्रारंभी महापालिका उपायुक्त अमिता दगडे-पाटील यांनी स्मार्ट शहराच्या प्रक्रियेत माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे मार्गदर्शन लाभावे या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे स्पष्ट केले. यानंतर महापालिकेच्या वतीने महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन राजेंद्र दर्डा यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय मनपा आयुक्तांसह विविध पक्ष, संघटनांनीही त्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी महापौर प्रा. सुशीला आबुटे, मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभापती रियाज हुंडेकरी, सभागृह नेते संजय हेमगड्डी, राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे, माजी महापौर अ‍ॅड. यु. एन. बेरिया, स्थायी समितीचे माजी सभापती पद्माकर काळे, नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, नगरसेविका फिरदोस पटेल, बसपा-माकपचे गटनेते आनंद चंदनशिवे, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार आदी उपस्थित होते.
सोलापूरची स्मार्ट सिटीमध्ये निवड होण्यासाठी योगदान दिल्याबद्दल महापौर सुशीला आबुटे व मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांचा यावेळी ‘लोकमत’च्या वतीने राजेंद्र दर्डा यांनी सत्कार केला. महिला दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहताना लोकमतने नेहमीच समीक्षकाचे काम केल्याचे महापौर आबुटे यांनी स्पष्ट केले. मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी स्मार्ट सिटीचे स्वप्न सत्यात अवतरेल, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी राजेंद्र दर्डा म्हणाले, ‘माझ्या स्वप्नातील स्मार्ट शहर’ हा विचार करताना ३६५ दिवस २४ तास पाणी मिळाले पाहिजे. सध्या शहराला सरासरी ११० एमएलडी पाणी मिळते. त्यातही जवळपास २५ एमएलडी पाणी गळतीमुळे वाया जाते. यावर अग्रक्रमाने महापालिकेने विचार करायला हवा. जनतेमध्ये बिल भरण्याची मानसिकता निर्माण व्हायला हवी. याचबरोबर लोकांचे विकासाचे प्रश्न सोडवताना एकत्रितपणे काम केले पाहिजे.
शहराचा विकास करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. दोन औद्योगिक वसाहती आहेत. रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. आगामी काळात याचा निश्चित फायदा होणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये निवड झाल्याने निधी उपलब्ध होईल. यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सामान्य माणसासाठी घरे, आरोग्य अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत होईल. महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षांचे प्रश्नही महत्त्वाचे आहे. ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटू शकतात. यामुळे सर्वांनी पाहिलेले हे स्वप्न साकार होईल, असा आशावाद व्यक्त करीत दर्डा यांनी मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास माजी महापौर मनोहर सपाटे, सर्व पक्षीय नगरसेवक व नगरसेविका, जी. एम. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दत्तोबा वाघमारे, मनपा कर्मचारी संघटनेचे परदेशी, लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने, सहा. सरव्यवस्थापक रमेश तावडे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: When raising a smart city, focus on basic questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.