शाळांची दिवाळी सुट्टी कधीपासून? पालक आणि शिक्षकही गोंधळात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 06:59 AM2021-10-28T06:59:46+5:302021-10-28T07:00:11+5:30
School Diwali Holiday : स्वतः शिक्षणमंत्र्यांनीच नवीन सुट्ट्यांच्या तारखांचे ट्विट केल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक तसेच मुख्याध्यापकांसह पालकांचा एकच गोंधळ उडाला आहे.
मुंबई : लॉकडाऊननंतर तब्बल दीड वर्षांनी सुरू झालेल्या शाळांनी शिक्षण निरीक्षकांनी, शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या आणि आता २ दिवसांतच सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून नवीन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. स्वतः शिक्षणमंत्र्यांनीच नवीन सुट्ट्यांच्या तारखांचे ट्विट केल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक तसेच मुख्याध्यापकांसह पालकांचा एकच गोंधळ उडाला आहे.
शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे १ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सुट्या गृहीत धराव्या की, आता शिक्षण सहसचिवांनी काढलेल्या पत्रकाप्रमाणे, शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या ट्विटप्रमाणे २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर हा सुट्टीचा कालावधी गृहीत धरावा, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन व शिक्षक, मुख्याध्यापक यांना पडला आहे.
पहिल्यांदा २० दिवसांची जाहीर झालेली सुट्टी शालेय शिक्षण विभागाने १४ दिवसांपर्यंत कमी केली आहे. सुट्टी कमी झाल्याने पालक व शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन बिघडल्याने मुख्याध्यापक वर्गातूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.
परीक्षांचे काय करावे?
उरलेल्या दिवसांतील परीक्षांचे काय करायचे?, काही ठिकाणी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ, चाचण्यांसाठी वेळ दिला आहे, त्यात शाळा बंद ठेवायच्या का?, असे प्रश्न मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव पांडुरंग केंगार यांनी उपस्थित केले आहेत.