सातव्या वेतन आयोगाचा अध्यादेश कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 06:19 AM2019-01-29T06:19:16+5:302019-01-29T06:19:36+5:30
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप स्थगित
मुंबई : राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील शासकीय आदेश कधी निघणार या बाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘जानेवारी पेड इन टू फेब्रुवारी’ अशी हमी राज्य सरकारने दिलेली होती मात्र, आता वेतनवाढीचा प्रत्यक्ष लाभ मार्चच्या पगारात मिळेल असे दिसते.
सातव्या वेतन आयोगाच्या जीआरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहीची प्रतीक्षा आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासाठीचा मसुदा तयार ठेवला आहे आणि येत्या एकदोन दिवसात सह्या होतील व राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर जीआर निघेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र देऊन २०१६ पूर्वीच्या निवृत्तीवेतन धारकांचे/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन सुधारित करण्याची मागणी केली आहे.
चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासूनचा दोन दिवसांचा संप स्थगित केला आहे. संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि अन्य पदाधिकाºयांशी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांची चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना म्हाडा व सिडकोमार्फत हक्काची घरे देण्यात येतील, आरोग्य विभागातील रिक्त चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची पदे भरण्यात येतील, सातव्या वेतन आयोगाबाबतचा जीआर तातडीने काढण्यात येईल, असे आश्वासन जैन यांनी दिल्याचे पठाण यांनी लोकमतला सांगितले. कर्मचाºयांच्या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा लवकरच चर्चा करण्याचे आश्वासन जैन यांनी दिले.