शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...; सुप्रिया सुळेंचा कथित ओबीसी दाखल्यावर खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 12:15 PM2023-11-12T12:15:03+5:302023-11-12T12:15:21+5:30
भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे आणि राष्ट्रवादीचे कौटुंबिक संबंध आहेत. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोज महाजन, मुंडे कुटुंब असे अनेक जणांशी संबंध आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. याचबरोबर काल शरद पवार यांना थोडे बरे वाटत नव्हते. तुम्ही मायबाप जनता त्यांचे डॉक्टर आहात. डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचा दौरा ते करु शकत नाही ते घरी भेटू शकतात. आज, उद्या , परवा ते घरी सगळ्यांना भेटतील, अशी हेल्थ अपडेट सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
नाती एका जागेवर आहेत आणि आमची राजकीय भूमिका एका जागेवर आहे. काल ही प्रताप पवारांच्या घरी असताना सांगितले की ही आमची लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे आणि राष्ट्रवादीचे कौटुंबिक संबंध आहेत. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोज महाजन, मुंडे कुटुंब असे अनेक जणांशी संबंध आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देत, सगळ्यांना सुखसमृध्दी लाभो. महाराष्ट्रातील बेरोजगारीचे, महागाईचे संकट लवकर दूर होवो. यासाठी मी पांडुरंगाला प्रार्थना करते, असे सुळे म्हणाल्या.
शरद पवार यांच्या ओबीसी दाखल्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी आरोपांना उत्तर दिले. कोणीही त्या कंपनीचे नाव पाहिलेले नाही. शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते, त्यावेळेस इंग्रजी मधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. हे सगळे हास्यास्पद चालू आहे. हा सगळा बालिशपणा सुरू आहे. खोटी प्रमाणपत्र हे मार्केटमध्ये खूप मोठे झाले आहे, असा टोलाही सुळे यांनी लगावला.