मिसाइल पडताना देश, झेंडा काही बघत नाही; तळा येथील यशचा युद्धाचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:52 AM2022-03-07T05:52:55+5:302022-03-07T05:53:00+5:30

२४ फेब्रुवारीला सकाळी ४ वाजल्यापासून मिसाइल पडत असल्याचे आवाज येऊ लागले. माझ्या आईवडिलांनी विमानतळ पूर्णतः बंद झाले आहे, याची माहिती दिली.

when the missile falls it does not see anything country, the flag; yash came from ukraine | मिसाइल पडताना देश, झेंडा काही बघत नाही; तळा येथील यशचा युद्धाचा अनुभव

मिसाइल पडताना देश, झेंडा काही बघत नाही; तळा येथील यशचा युद्धाचा अनुभव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळा : सकाळी ४ वाजता पहिले मिसाइल पडले आणि त्या भयंकर आवाजाने आम्ही उठलो. सुखरूप पोहोचण्यासाठी तुम्ही भारताचा झेंडा लावा, असे सांगण्यात आले. परंतु, आधीच सोडलेले मिसाइल हे नाही ना बघणार की, तुम्ही कोणत्या देशाचा झेंडा लावला, हे पाहून पडणार नसल्याने काळजात धडकी भरली होती. वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या तळा शहरातील यश काळबेरे याने रशिया आणि युक्रेन युद्धातील भयानक अनुभवांचे कथन ‘लोकमत’शी केले आहे. 

२४ फेब्रुवारीला सकाळी ४ वाजल्यापासून मिसाइल पडत असल्याचे आवाज येऊ लागले. माझ्या आईवडिलांनी विमानतळ पूर्णतः बंद झाले आहे, याची माहिती दिली. त्यावेळेपासूनच मनात काहूर माजले होते. जवळपास १५ दिवस पुरेल एवढे खाद्यपदार्थ घेऊन मित्रांसोबतच बाहेर पडलो. केंद्र सरकार नागरिकांना घेण्यासाठी युक्रेनमध्ये नाही, तर  बाजूच्या देशांमध्ये पाठवणार आहे. रोमानिया व हंगेरीच्या बॉर्डर आमच्यापासून ९०० किमी लांब अंतरावर होत्या. त्यामुळे आमच्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मलडोवा बॉर्डरवर जायचा आम्ही निर्णय घेतला. मलडोवासाठी आमचा बसने प्रवास सुरू झाला. 

नशिबाने चालक चांगला असल्याने आजूबाजूला मिसाइल कोसळण्याचा आवाज येत असताना कसेबसे बॉर्डरवर पोहोचलो. महिला आणि लहान मुले यांनाच बॉर्डर पार करू देत होते. दोन वाजल्यापासून आम्ही बॉर्डरवर उभे होतो. साधारणत: ११ वाजता आम्हाला बॉर्डर पार करू दिली. कसेतरी रोमानिया एअरपोर्टवर पोहोचलो. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला समजले की, २६  फेब्रुवारीपासून या ठिकाणी बरीचशी मुले येऊन थांबलेली होती. 
आम्हाला अजित नावाचा दूतावासातील व्यक्ती भेटली. त्यांना खूप विनवणी केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारशी बोलून २६ फेब्रुवारीच्या विमानात आम्हाला समाविष्ट केल्यानंतर रोमानिया विमानतळावरून विमानाने दिल्लीकडे प्रस्थान केले.

दिल्लीला पोहोचल्यावर त्या ठिकाणी माझे बाबा माझी आतुरतेने वाट पाहत होते. मी माझ्या बाबांना बघताच त्यांना कडकडून मिठी मारली. दुसऱ्या दिवशी आम्ही  तळा येथे पोहोचलो. केंद्र सरकारने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, अजूनही काही भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांनादेखील आपल्या घरी सुखरूप परतण्यासाठी सरकारने मदत करावी.
- यश काळबेरे, युक्रेनमधून परतलेला विद्यार्थी

Web Title: when the missile falls it does not see anything country, the flag; yash came from ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.