खिशात पैसे नसताना ‘शिवस्मारकाचा’ घाट कशाला
By admin | Published: January 8, 2017 09:54 PM2017-01-08T21:54:09+5:302017-01-08T21:54:09+5:30
शिवाजी महाराजांची महती जपण्यासाठी त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा, अशी कानउघडणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 : राज्यात असलेल्या किल्ल्यांचे संवर्धन करण्यास सरकार असमर्थ ठरत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा अरबी समुद्रात उभारण्याचा घाट म्हणजे खिशात पैसे नसताना घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची महती जपण्यासाठी त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा, अशी कानउघडणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.
जागतिक मराठी अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (ट्रस्ट) तर्फे दादर येथील शिवाजी मंदिर येथे दोन दिवसीय मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या संमेलनाच्या सांगता सोहळ््यात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
शिवस्मारकाविषयी राज म्हणाले की, अमेरिकेतील स्टॅच्यू आॅफ लिबर्टीच्या शिल्पाला समोर ठेवून अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. परंतु समुद्रात हे शिल्प उभारण्यापूर्वी शिल्प म्हणजे काय? याची माहिती आहे का? उभारलेल्या पुतळ््यांवरुन गल्लोगल्ली होणारे राजकारण कमी आहे का ? त्यात आणखी नवा पुतळा समुद्रात उभारायचा कशाला़? शिवाजी महाराजांबद्दल इतकाच आदर असेल तर त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज कोण? हे लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना इतिहास भुगोलाच्या माध्यमातून शिकवा. तरच तो अधिक बिंबेल आणि असे पुतळे उभारण्याची गरज भासणार नाही.
नोटाबंदीवर टिका करताना ते म्हणाले की, ८ नोव्हेंबर रोजी ज्या आत्मविश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा जो निर्णय घेतला तो आत्मविश्वास ३१ डिसेंबर रोजी झालेल्या भाषणात दिसला नाही. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. आणि हे मी म्हणत नाही तर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे.
बुलेट ट्रेन विषयी ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या योेजनेत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा समावेश आहे; ती कशाला? यामागे स्वतंत्र मुंबई करण्याचे मोदी यांचे षडयंत्र आहे. कारण मुंबई-दिल्ली अशी विमान फेऱ्यांना अधिक मागणी असताना मुंबई-अहमदाबाद हा मार्ग कशाला? विशेष म्हणजे या प्रवासात राज्यासाठी केवळ चारच थांबे आहेत. त्यामुळे हे षडयंत्र ओळखा, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज यांनी यावेळी त्यांच्या व्यंगचित्राचा प्रवास उलगडला. पाश्चिमात्य कलांविषयी ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशात कलेचा कदर केला जातो. ती आपल्या देशात हवी तशी केली जात नाही. जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये सहलीसाठी आलेली किती मुले तेथील चित्रे पाहतात? हा प्रश्न आहे. कारण दिलेल्या वेळेत मुलांना जहांगीर आर्ट गॅलरी दाखवली जाते. तेथे मांडलेली चित्रे नाही. त्यामुळे कलेची बीजे मुलांमध्ये रुजणार कशी? उदाहरणादाखल ते म्हणाले की, २६ जुलै २००५ च्या मुंबईच्या पावसात चित्रकार माधवराव सातवळेकर यांनी काढलेल्या चित्रांचा अक्षरश: चिखल झाला. त्यांच्या या अमूल्य चित्रांसाठी सरकार पुढे सरसावले नाही. ही खंत आहे. त्यामुळेच कलेची कदर भारतात इतर देशांच्या तुलनेत होत नाही.
कला टिकविण्यासाठी इतिहासाचे जतन करणे आवश्यक आहे. ते केले जात नाही. त्याला कारणीभूत शिक्षणपद्धती आहे. आपल्याकडे शिक्षणपद्धतीची तर बोंबच आहे. येणारा प्रत्येक नवा शिक्षणंमंत्री आपल्याप्रमाणे शिक्षणाविषयीचे धोरण ठरवतो. परंतु शिक्षणपद्धतीत सुधारणा झालेली दिसत नाही. उलट मुलांसमोर काय करावे हा प्रश्न कायमच असतो. शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असून अभ्यासक्रम हा एकत्रित विचार करुन तयार केला पाहिजे. म्हणजे आता होणारा गोंधळ टाळता येईल. दप्तरांच्या ओझ्यावर टीका करताना ते म्हणाले की, दप्तरांचे ओझे म्हणजे काय? हे नेमके कोणाला कळाले नाही. कारण काटे घेऊन केवळ दप्तरांचे वजन मोजण्यापेक्षा पुस्तके कशी कमी करता येईल याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.