पाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का?- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 05:46 AM2018-09-22T05:46:31+5:302018-09-22T05:46:48+5:30
तेव्हा आमचा पक्ष जातीयवादी नव्हता का, असा चिमटा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना काढला.
मुंबई : अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोनदा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता तेव्हा आमचा पक्ष जातीयवादी नव्हता का, असा चिमटा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना काढला.
काँग्रेससोबत युतीचा आपण विचार करू पण राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष असल्याने त्यांच्यासोबत जाणार नाही, असे अॅड. आंबेडकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यावर नेहरू सेंटर येथे स्वत:च्या चित्रांवर भरलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, मला वर्ष आठवत नाही. पण, ईशान्य मुंबईत आमच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकर यांच्या पक्षाने डॉ. नीलम गोºहे यांना उभे केले होते. त्याचा लाभ भाजपाचे प्रमोद महाजन यांना झाला होता. भाजपाला लाभ पोहोचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी सांगू नयेत, असेही पवार म्हणाले.
बसपाने छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या पक्षाशी आघाडी केल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, त्यांच्यात आधीपासूनच बोलणी सुरू होती. काँग्रेसने तेथे कुणालाही सोबत न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असावा.
>भागवतांचे विधान गंभीर
राम मंदिर बांधले नाही, तर देशात महाभारत घडेल या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विधानावर पवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांची असते. भागवत हे सरकारचे सल्लागार आहेत. त्यांना या वक्तव्यातून काहीतरी सूचित करायचे आहे, हे नक्की. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. देशाला आज रामायण, महाभारताची गरज नाही, असेही पवार यांनी सांगितले.