भाषा विभाग कधी सक्षम होणार?
By admin | Published: February 27, 2016 02:37 AM2016-02-27T02:37:11+5:302016-02-27T02:37:11+5:30
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत मराठी भाषा विभाग सुरू केला असला तरी त्याच्या सक्षमीकरणाचा प्रस्ताव अजून सरकार दरबारी पडून आहे. सरकारचा या विषयाचा अभ्यास
ठाणे : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत मराठी भाषा विभाग सुरू केला असला तरी त्याच्या सक्षमीकरणाचा प्रस्ताव अजून सरकार दरबारी पडून आहे. सरकारचा या विषयाचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नसल्याने मराठी विभाग बाळसे धरण्याची शक्यता कमी असल्याची खंत मराठी भाषाप्रेमी व्यक्त करीत आहेत.
सरकारने केवळ मराठी भाषा विभाग सुरू करण्याचा उपचार पार पाडला आहे. या विभागाच्या सक्षमीकरणाचे घोडे अद्यापही अडलेले असल्याने मराठी भाषेचा
ज्या प्रभावीपणे वेगवेगळ्या ठिकाणी वापर व्हायला हवा होता, तसा
होत नाही, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी ‘लोकमत’कडे मांडली आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी मराठी भाषा विभागाच्या सक्षमीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे. मराठी भाषा दिन यापूर्वी १ मे रोजी साजरा केला जात होता. मात्र, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले. तेव्हापासून मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारीला साजरा केला जात आहे.
मराठी अभ्यास केंद्रातर्फे सक्षम
मराठी भाषा विभागाचा प्रस्ताव २०१०मध्ये मांडण्यात आला होता. मराठी भाषा ही रोजगारासाठी उपयुक्त व्हावी. ती इंग्रजीप्रमाणे ज्ञानभाषा व्हावी, यासाठी राजकीय पक्ष आणि सरकार यांची जबाबदारी आहे. मात्र, त्यांच्याकडून ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली जात नाही. भाषा विकासाची यंत्रणा सक्षम केली पाहिजे. त्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. सरकारने सक्षम मराठी भाषा विभाग सुुरू करावा. त्यासाठी पूर्णवेळ सचिव देण्यात यावा, अशी मागणी वारंवार करूनही सरकारने अद्याप काही केलेले नाही. सरकारचा दृष्टिकोन मराठी भाषेविषयी संवेदनशील नाही. त्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सरकारकडूनच प्रतिसाद अत्यंत
थंड स्वरूपाचा आहे, असेही पवार म्हणाले.
यासंदर्भात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रस्तावातील काही गोष्टी लागू करण्यात आल्या आहेत. जसे न्यायालयीन कामकाजाची भाषा मराठी व्हावी. शासनाच्या नियमांच्या चौकटीत राहून जितके करता येईल, तेवढे करणार आहे. डॉ. सदानंद मोरे यांना यातील गोष्टींवर अभ्यास करायला सांगितला आहे. या प्रस्तावातील काही मागण्या मान्य केल्या आहेत. (प्रतिनिधी)