माझ्या वाट्याचे शिल्लक पैसे केव्हा देणार?
By admin | Published: December 23, 2016 05:29 AM2016-12-23T05:29:09+5:302016-12-23T05:29:09+5:30
नोटाबंदीचा घोळ संपेपर्यंत खातेदारांना त्यांच्या बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतील, असे आश्वासन सरकारने
मुंबई : नोटाबंदीचा घोळ संपेपर्यंत खातेदारांना त्यांच्या बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतील, असे आश्वासन सरकारने देऊनही बहुतांश खातेदारांना बँकांनी एवढे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे अशा ग्राहकांना त्यांच्या वाट्याची उरलेली रक्कम ३१ डिसेंबरपूर्वी काढू देणार का, असा प्रातिनिधिक आणि मार्मिक सवाल एका खातेदाराने केंद्राला पत्र पाठवून केला आहे.
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय निमंत्रक सर्वजित रॉय यांनी केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिवांना लिहिलेल्या पत्रात हा सवाल केला असून, त्याची प्रत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि कॅबिनेट सचिवांनाही पाठविण्यात आली आहे. रॉय हे आंध्र बँकेचे खातेदार असून, गेल्या १५ दिवसांत वारंवार रांगा लावूनही आपल्याला फक्त दोन वेळा प्रत्येकी २ हजार रुपये खात्यातून काढता आल्याचे त्यांनी नमूद केले आहेत.
रॉय यांनी सरकारला विचारले की, तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गेल्या दोन आठवड्यांचा आणखी ४४ हजार रुपये खात्यातून काढण्याचा माझा हक्क शाबूत आहे. हा हक्क यापुढील आठवड्यांमध्ये ‘कॅरी फॉरवर्ड’ होऊन मला ३१ डिसेंबरपूर्वी माझ्या हक्काचे सर्व पैसे काढता येतील का? (विशेष प्रतिनिधी)
नोटांचे वाटप समन्यायी हवे‘इंटक’ प्रणीत ‘इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन’चे सरचिटणीस सुभाष सावंत यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून सर्व बँकांना त्यांच्या शाखा आणि खातेदारांची संख्या विचारात घेऊन नोटांचे समन्यायी वाटप करण्याची मागणी केली आहे. रिझर्व्ह बँक नव्या नोटांचे वितरण करताना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बाबतीत पक्षपात करीत असल्याचे फेडरेशनने याआधीही निदर्शनास आणले होते.
सावंत लिहितात की, नोटांची टंचाई आणि सरकार व रिझर्व्ह बँकेकडून प्रत्यही रोज काढले जाणारे उलटसुलट फतवे यामुळे ग्राहकांच्या रोषाला बँक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी सरकारने सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावेत आणि निदान नव्या वर्षापासून तरी खातेदारांना त्यांच्या खात्यातून पुरेसे पैसे काढता येतील, अशी व्यवस्था करावी.