महाराष्ट्राच्या एकीची वज्रमूठ कधी उगारणार ?- उद्धव ठाकरे
By admin | Published: January 21, 2017 07:08 AM2017-01-21T07:08:08+5:302017-01-21T07:13:52+5:30
जल्लिकटूवरील बंदीविरोधात तामिळी ऐक्याचे विश्वदर्शन घडत आहे, तसे महाराष्ट्रात कधी घडणार ?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - जल्लिकटूवरील बंदीविरोधात तामिळी ऐक्याचे विश्वदर्शन घडत आहे, तसे महाराष्ट्रात कधी घडणार ?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. जल्लिकट्टू हा एक पारंपरिक साहसी खेळ आहे. त्यावर मतभेद असू शकतात. पण ही एक शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा, तिच्याशी जोडल्या गेलेल्या जनभावनांचाही विचार व्हायला हवा. प्रथा आणि परंपरा याबद्दलचे वाद सुरूच राहतील. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाची ठरते ती त्यावरून होणारी त्या देशाची, प्रांताची एकी. तामिळनाडू जनतेने जी ऐक्याची वज्रमूठ उगारली आहे ती महाराष्ट्र कधी उगारणार?, असा सवाल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला विचारला आहे.
मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, मराठी प्रांत, मराठी माणूस यांवर अन्याय्य कारवाईची कु-हाड आजपर्यंत अनेकदा पडली. आजही ती पडतच असते. मात्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा अपवाद वगळता मराठीजनांच्या एकीचे दर्शन देशाला झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे, अशी खंतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
सामनाच्या अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे
- सामान्य माणसापासून सेलिबेटीजपर्यंत, साध्या कार्यकर्त्यापासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सगळेच अम्मांच्या दीर्घायुष्यासाठी रस्त्यावर उतरले होते. आज तामिळनाडूत पुन्हा असाच जनआक्रोश रस्तोरस्ती, शहरांत, खेड्यांत दिसत आहे. तामिळनाडूतील सामान्य जनतेपासून सेलिबेटीज, स्टार अभिनेते, खेळाडू असे सगळेच जल्लिकट्टूवरील बंदीच्या एका मुद्द्यावर एकवटले आहेत. ही एकीची वज्रमूठ तामिळनाडूने आता उगारली आहे. जल्लिकट्टूच्या निमित्ताने जो उद्रेक तामिळनाडूमध्ये दिसत आहे ते चित्र महाराष्ट्रात कधी दिसेल.
- पोंगल सणानिमित्त तामिळनाडूत जल्लिकट्टू म्हणजे बैलांच्या शर्यती हा पारंपरिक खेळ उत्साहात खेळला जातो. मात्र या खेळात बैलांचा छळ होतो हे कारण देऊन या स्पर्धांना सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये बंदी घातली. ही बंदी उठवावी या मागणीसाठी तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे. अभिनेता कमल हसन, संगीतकार ए. आर. रेहमान, बुद्धिबळपटू ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद आदी मान्यवरांनीही या बंदीविरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्याचे कारण त्यांची भाषिक आणि पारंपरिक अस्मितेशी घट्टपणे जुळलेली नाळ हेच आहे.
- महाराष्ट्रातही बैलगाड्यांच्या शर्यतींवर न्यायालयीन बंदीची कुऱहाड पडली होती. आता ही बंदी हटवली गेली असली तरी गाडामालकांच्या पाठीशी त्यावेळी उभी राहिली होती ती फक्त शिवसेनाच. कर्नाटकातील मराठी सीमाबांधवांच्या खांद्याला खांदा लावून लढणारीही शिवसेनाच आहे.
- सध्याची न्यायालये किंवा कायदा वगैरे अस्तित्वात नव्हता त्याआधीपासून हे पारंपरिक खेळ खेळले जात आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. याचा अर्थ पारंपरिक साहसी खेळात हिंसा असावी, अमानवी प्रकार असावेत असा नाही. मात्र त्यावर सरसकट बंदी हा एकमेव उपाय ठरू शकतो का, हा खरा प्रश्न आहे.
- स्पेनमधील ह्यबुल फाइटह्ण हा तसाच क्रीडा प्रकार आहे. स्पॅनिश जनता उत्साहाने तो खेळते. मात्र यात बैलांचा छळ होतो असे निरीक्षण तेथील न्यायव्यवस्थेने नोंदविल्याचे अद्याप तरी समोर आलेले नाही.
- बत्तीसशिराळा येथे नागपंचमीनिमित्त होणा-या परंपरागत खेळांवरील बंदी, दहीहंडीचे थर, गणेशमूर्तींची उंची, सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपांची लांबी-रुंदी, मुंबईच्या शिवतीर्थावरील जाहीर सभा, दिवाळीतील फटाक्यांचे आवाज, त्यावर लावली जाणारी डेसिबलची चिकटपट्टी असे अनेक दांडपट्टे महाराष्ट्र आणि मराठी प्रथा परंपरांवरही नेहमीच फिरत असतात. प्राणी मारून खाल्ले जातात, त्यावर बंदी नाही. बकरी ईदच्या दिवशी लाखो बकरे कुर्बान केले जातात. ही प्रथा कुणाला अमानवी वाटत नाही. पुन्हा हिंदू प्रथा आणि परंपरांवर हातोडा उगारणारी न्यायालयेदेखील अशावेळी मवाळ होतात.
- सर्कशीतले प्राण्यांचे खेळ अमानुष ठरवून त्यावर बंदी घातली जाते. या बंदीमुळे सर्कस व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेले मोठे अर्थकारण कोलमडले. ही समज या प्राणीमित्रांना आणि आमच्या न्यायालयांना कधी येणार ?