एकनाथ शिंदेंचे 'चलो मुंबई'; आजच राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीसांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:02 PM2022-06-30T13:02:27+5:302022-06-30T13:03:25+5:30
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेनं इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाचा सामना केला. दरम्यान, यानंतर आता राज्यात नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात सरकार केव्हा स्थापन होईल हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. “आजच्या बैठकीत शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. सर्व ५० आमदारांनी मला अधिकार दिले आहेत आणि अधिकृत केलं आहे. पुढची रणनीती मुंबईत गेल्यानंतर ठरवून कळवली जाईल. नंतर मी पुन्हा गोव्याला जाणार आहे. सध्या दोन प्रस्ताव दिले आहेत. त्यानुसार मी तिकडे जात आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
“उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याचा आनंद आम्हाला नाही. आमची ५० आमदारांची मागणी एकच होती. मतदार संघातले जे प्रश्न आणि अडचणी होत्या, त्यांना जे काही वाईट चांगले अनुभव येत होते, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेऊया अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे होती. वेळीच यावर निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. उद्धव ठाकरेंबाबत कालही आणि आजही आम्हाला आदर आहे. मी सध्या मुंबईत गेल्यावर यावर बैठक होईल आणि त्यांनतर त्यावर निर्णय होईल. राज्यपालांशी भेट होईल त्यानंतर पुढील रणनीती सांगितली जाईल आणि नंतर देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेणार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.