२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
By दीपक भातुसे | Updated: April 22, 2025 07:38 IST2025-04-22T07:38:11+5:302025-04-22T07:38:50+5:30
अपात्र महिलांना सुमारे ९०० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे.

२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
दीपक भातुसे
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केली असून त्या या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. तसेच, ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरले त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत. मात्र, अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का, असा प्रश्न आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे.
१३ लाखांवर महिला ठरल्या अपात्र
२८ जून २०२४ रोजी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी १ जुलै ते १५ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची मुदत होती. या काळात सुमारे २.५ कोटी महिलांना अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळाली. विधानसभा निवडणुकीनंतर १३ लाखांवर महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. अपात्र महिलांना सुमारे ९०० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे.
या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर सामूहिक उन्नतीसाठी करणाऱ्या महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येणार याबाबत अजून स्पष्टता नाही.
अद्याप हालचाल नाही
राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे महिला व बालकल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
यासंदर्भातील मूळ शासन निर्णयात जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केली. अर्ज पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल. - अदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री