तोंडात साखर कधी पडणार?, पालकमंत्री नियुक्त्या : अजित पवार गटाचे मंत्री दोन महिन्यांपासून ताटकळले
By दीपक भातुसे | Published: August 29, 2023 08:22 AM2023-08-29T08:22:43+5:302023-08-29T08:23:31+5:30
काही जिल्ह्यांवरून महायुतीत वाद असल्याने या नियुक्त्या रखडल्या असल्याची चर्चा आहे.
- दीपक भातुसे
मुंबई : भाजप आणि शिंदे गटात अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर महायुती अस्तित्वात आली. समन्वय समितीची स्थापनाही करण्यात झाले आहे. मात्र अजित पवारांसह त्यांच्या गटातील नऊ जणांचा मंत्रिमंडळात सहभाग होऊन दोन महिने होत आले तरी या नऊ मंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळालेले नाही. काही जिल्ह्यांवरून महायुतीत वाद असल्याने या नियुक्त्या रखडल्या असल्याची चर्चा आहे.
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर तात्पुरती जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, ध्वजारोहणापुरते हे मंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर मात्र पालकमंत्री म्हणून कायमस्वरुपी नियुक्त्या या मंत्र्यांना मिळालेल्या नसल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येही नाराजी आहे.
मागील दोन महिन्यात समन्वय समितीची एकच बैठक पार पडली आहे. या बैठकीतही विशेष चर्चा झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आणि महायुतीतील इतर विषयांवर निर्णय घेण्यासाठी या आठवड्यात समन्वय समितीची बैठक व्हावी, असा आग्रह राष्ट्रवादीने धरला असल्याचे अजित पवार गटातील एका नेत्याने सांगितले.
तीनही पक्षांच्या नेत्यांचे दौरे, सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम यामुळे बेैठकीसाठी वेळ मिळत नव्हता. मात्र येणाऱ्या तीन-चार दिवसात समन्वय समितीची बैठक होईल. या बैठकीत महामंडळ, त्याच्या समित्या आणि विधिमंडळ समित्यांच्या नियुक्त्यांबाबत चर्चा होईल. पालकमंत्री हा विषय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरील आहे.
- प्रसाद लाड, अध्यक्ष, महायुती समन्वय समिती
पालकमंत्रिपदाचा निर्णय हा तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी सक्षम आहेत.
- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
‘तुझ्या तोंडात साखर पडो...’
सोमवारी पुण्यात एका पत्रकाराने (‘लोकमत’च्या नव्हे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होणार, अशी चर्चा आहे...’ असा प्रश्न केला असता ‘तुझ्या तोंडात साखर पडो...’ असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले आणि हंशा पिकला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सत्तेत सहभागी होताना दहा मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. नऊ जणांना मंत्रिपद मिळाले आहे, तर एक मंत्रिपद शिल्लक आहे.