‘ते’ घरी कधी येणार...? वाटेकडे कुटुंबाचे डाेळे, १७ दिवस लोटले, घरच्यांशी भेट नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 09:30 AM2023-09-15T09:30:56+5:302023-09-15T09:31:10+5:30
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची उपोषणाच्या १७ दिवसांत कुटुंबीयांसमवेत एक वेळही भेट झालेली नाही. भेट सोडा मोबाइलवरही संवाद झालेला नाही.
- पवन पवार
वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची उपोषणाच्या १७ दिवसांत कुटुंबीयांसमवेत एक वेळही भेट झालेली नाही. भेट सोडा मोबाइलवरही संवाद झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी उपोषणस्थळी आले आणि जरांगे यांचे आमरण उपोषण सुटले; परंतु, साखळी उपोषण सुरू आहे. त्यामुळे जरांगे हे घरी कधी येणार, याची प्रतीक्षा त्यांच्या पत्नीसह मुलं व आई-वडिलांना लागली आहे.
लोकमत प्रतिनिधीने गुरुवारी जरांगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली. जरांगे यांनी दि. २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले. त्याच दिवशी कुटुंबातील सदस्यांची त्यांची भेट झालेली. त्यानंतर प्रत्येक घडामोडी या कुटुंबातील सदस्यांना टीव्हीवरून आणि शेजारी, नातेवाईक यांच्याकडून समजल्या. आपण उपोषणस्थळी गेलो तर ते भावनिक होतील, आपणही भावनिक होऊ म्हणून कुटुंबातील एकही सदस्य तिकडे गेला नाही. नव्हे १७ दिवसांत एक वेळेसही मोबाइलवर त्यांचे बोलणे झालेले नाही.
मनोजची काळजी वाटते; परंतु, जनता त्याच्यासोबत आहे, त्यामुळे भीती वाटत नाही.
- रावसाहेब जरांगे, वडील
२२ वर्षे झाली, ते उपोषण करतात. आता कुठं आरक्षण मिळेल, असे वाटतेय. मी तेथे गेले तर माझ्या डोळ्यात पाणी येईल आणि ते त्यांना पाहवणार नाही. यामुळे मी तेथे गेले नाही.
- सुमित्रा जरांगे, पत्नी
मागील १७ दिवसांत वडिलांची एकदाही भेट झाली नाही. मी यापूर्वी शहागड येथील मोर्चात भाषण केलं. त्यानंतर बुलढाणा येथे भाषण केलं. माझी प्रेरणा माझे वडील आहेत. पप्पा घरी कधी येणार याची वाट पाहत आहे.
- पल्लवी जरांगे, मुलगी