पर्यटनस्थळांचा विकास पालिका कधी करणार?
By admin | Published: May 18, 2016 03:50 AM2016-05-18T03:50:38+5:302016-05-18T03:50:38+5:30
पालघर जिल्ह्यात जव्हार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
हुसेन मेमन,
जव्हार- पालघर जिल्ह्यात जव्हार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र तसेच दमण व गुजरात राज्यातील शेकडो पर्यटक येथे येत असतात. समुद्र सपाटीपासून १७०० फुट उंचीवर असलेल्या या शहरात व तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करीत असतात. पर्यटन विकास निधीतून काही स्थळांचा थोडाफार विकास झाला खरा परंतु शहरातील हनुमान पॉइंट , सनसेट पॉइंट , शिरपामाळ , जयसागर धरण , शिवाजी उद्यान , सूर्य तलाव , यांचा म्हणावा तितका विकास आजही झालेला नाही. १० वर्षा पूर्वी पालिकेत शिवसेनेची सत्ता असतांना त्यांनी खासदार निधीतून सनसेट व हनुमान पॉइंट येथे संरक्षक भिंत व पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून काही प्रमाणात कामे केली. मात्र मध्यंतरीच्या काळात या स्थळांकडे दुर्लक्षच झाले. लाल माती हे जव्हार चे विशिष्ट परंतु विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी काँक्रीटीकरण केल्यामुळे नैसर्गिक सोंदर्य नष्ट होते कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वास्तविक नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करावयास हवा होता.ओसाड ठिकाणी विविध आकर्षक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन झाले असते तर प्रत्तेक ठिकाणी गर्द मोठे वृक्ष होऊन वनराई झाली असती. परंतु आजपर्यंत दरवर्षी नागरिकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या वृक्ष करातून पावसाळ्यात वृक्ष लागवडीच्या नावाखाली पालिका निकृष्ट दर्जाची छोटी रोपे लावते व आपला कर सत्कारणी लावल्याचा देखावा निर्माण करते. त्याकडे नंतर ढुंकूनही पाहिले जात नसल्यामुळे ती रोपे मरून जातात. पुन्हा पुढील वर्षी त्याच ठिकाणी लाखोंचा खर्च करून वृक्षारोपण केले जाते. हा गोरखधंदा आजही चालू आहे.
।हिरवळ वाळली, खेळण्यांची झाली वाताहत
वृक्ष लागवडी बरोबरच त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावयास हवे होते.ते काम डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दासांनी ५ वर्षापासून केल्यामुळे आज अनेक झाडांना नवी पालवी फुटली आहे. परंतु प्रत्येक स्थळांच्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी बसविणे , हिरवळ लावणे , हि कामे झालीच नाहीच उलट शिवाजी उद्यानातील खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान मुलांना खेळता येत नाही. सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेल्या हनुमान पॉर्इंट येथे तर महिन्यापूर्वी बसण्यासाठी एकही बाक नसल्यामुळे पर्यटकांत तीव्र नाराजी होती.
जव्हार मर्चंट पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून तिथे ५ बाक बसविण्यात आलेत.परंतु ते पुरेसे नाहीत. लहान मुले , महिला , व जेष्ठ नागरिकांची त्यामुळे मोठी कुचंबणा होते. लहान मुले तेथील लोखंडी पाईप वर बसत असतात खाली मोठी दरी असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी तरी पालिकेने वृक्ष कराचा योग्य विनियोग करावा , सर्वसाधारण निधीतून प्रत्येक ठिकाणी बसण्याची सोय करावी व लहान मुलांसाठी खेळणी बसवावीत विकासाच्या नावाखाली काँक्रिटीकरण न करता निसर्ग सौंदर्य वाढवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे