महिला बालकल्याण समितीला सभापती मिळणार तरी केव्हा?
By admin | Published: January 19, 2017 03:55 AM2017-01-19T03:55:17+5:302017-01-19T03:55:17+5:30
महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन अर्धा महिना उलटला तरी अद्याप सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही.
कल्याण : महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन अर्धा महिना उलटला तरी अद्याप सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. कोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूकही झाली आहे. परंतु, जिल्ह्यातील अन्य महापालिका निवडणुकांच्या कामांमध्ये यंत्रणा व्यस्त असल्याने केडीएमसीतील महिला बालकल्याण सभापतीपदाच्या निवडणुकीला विलंब लागत असल्याचे बोलले जात आहे.
महिला बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांत सेना गटाचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. समितीतील सदस्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपुष्टात आल्याने तत्पूर्वी समितीवर नव्या सदस्यांच्या प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार नियुक्तीच्या अनुषंगाने २६ डिसेंबरला विशेष महासभा बोलवली होती. यात नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, शीतल भंडारी, ऊर्मिला गोसावी, वैशाली भोईर (सर्व शिवसेना आघाडी गट), वैशाली पाटील, रेखा चौधरी, इंदिरा तरे, वृषाली पाटील-जोशी (सर्व भाजपा कल्याण-डोंबिवली विकास आघाडी), तर काँग्रेसच्या हर्षदा भोईर या नवनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर देवळेकरांच्या वतीने करण्यात आली. या समितीवर भाजपाच्या वतीने वैशाली पाटील आणि काँगे्रसच्या वतीने हर्षदा भोईर यांना पुन्हा संधी मिळाली आहे. पुढील सभापतीपद भाजपाकडे राहणार आहे. गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करत मनसेच्या वतीने सदस्याचे नाव देण्यात न आल्याने महापौरांकडून १० जणांचीच घोषणा करण्यात आली. एका सदस्याची नियुक्ती न झाल्याने बालकल्याण सभापतीपद निवडणुकीत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे महापौर देवळेकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>दोन ते तीन दिवसांत तारीख होणार जाहीर
सचिव कार्यालयाकडून कोकण विभागीय आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार झाला आहे. परंतु, त्यांच्याकडून निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. अन्यत्र मनपा आणि जि.प.च्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यात ठाणे जिल्हा परिषदेसह काही महापालिकांचाही समावेश आहे. त्यामुळेच महिला बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत तारीख जाहीर होतील, असा केडीएमसीचा दावा आहे.