“बंद खोलीत बसून राहिलं की बाहेरचं जग संपल्यासारखं वाटायला लागतं”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 08:23 PM2022-08-20T20:23:51+5:302022-08-20T20:25:05+5:30
आशिष शेलारांचं शिवसेनेला प्रत्युत्तर.
“आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच,” असा टोला लगावत भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी सेनेला प्रत्युत्तर दिले. भाजपच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर आता शेलार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
“हिंदूत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या सुपुत्रांना पूर्ण करण्यास जमले नाही. म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पूण करु नये का? ते इतरांनी पूण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का? आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूण करतात. याचा, त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना? पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते! फक्त, भरला आहे म्हणायला मोठे मन लागते' असा टोलाही शेलार यांनी यावेळी लगावला.
हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मा. सुपुत्रांना पुर्ण करण्यास नाही जमले... म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 20, 2022
ते इतरांनी पुर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का?
1/3
“उरला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप वापरते असे जे सुपुत्रांना वाटतेय हे म्हणजे अती झाले आणि हसू आले. पण काय करणार? आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच,” असे म्हणतही त्यांनी टीकेचा बाण सोडला.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
“देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत त्यांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले आणि मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी, कबुली आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.