पालक म्हणून कुठे कमी पडतोय आम्ही?  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 11:19 AM2024-10-27T11:19:33+5:302024-10-27T11:22:51+5:30

गेल्या काही दिवसांत दर एक दिवसाआड एका बालकाने आयुष्य संपवलं. गेल्या पंधरवड्यात अशा बातम्या वर्तमानपत्रातून वाचताना मन अतिशय विषण्ण झालं आणि स्वतःलाच परत परत का घडले असे?, व्यथित होऊन सारखं विचारू लागलं !

Where are we falling short as parents?   | पालक म्हणून कुठे कमी पडतोय आम्ही?  

पालक म्हणून कुठे कमी पडतोय आम्ही?  

- महेश माणिकराव डोलारे 
(मानव संसाधन विशेषज्ञ, छत्रपती संभाजीनगर)

आपला मुलगा / मुलगी जास्तीत जास्त वेळ मित्र / मैत्रिणीशी बोलेल, नातेवाइकांकडे राहील/जाईल किंवा त्यांच्या संपर्कात राहील, हे आपण त्याला आपल्या वर्तनातून शिकविले पाहिजे. जेव्हा कुणीतरी जवळचं वाटणारं असतं तेव्हा कोणताही पाल्य हा उद्विग्न अवस्थेत पोहोचूच शकत नाही. 
तेव्हा माझ्या प्रिय पालक मित्रांनो, जागे व्हा आपल्या पाल्याशी सतत संवाद साधा. या संवादातूनच तुम्ही त्यांच्या मनातील अविचारांची चलबिचल ओळखू शकता आणि त्यावर योग्य ते उपचार करू शकता.... तुम्हीच त्यांचे डॉक्टर बना आणि या उपरही तुम्हाला अगदीच गरज भासली तर एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास लाजू नका. 
कानकूस करू नका. कारण ही फक्त मनाची एक अवस्था आहे आणि आपल्याला त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढायचं आहे. येथे मला बहिणाबाईंची एक कविता आठवते...
मन वढाय वढाय 
मन जारी जारी,
याचं न्यारे रे तंतर। 
इचू साप बरा, 
त्याले उतारे मंतर

गेल्या काही दिवसांत दर एक दिवसाआड एका बालकाने आयुष्य संपवलं. गेल्या पंधरवड्यात अशा बातम्या वर्तमानपत्रातून वाचताना मन अतिशय विषण्ण झालं आणि स्वतःलाच परत परत का घडले असे?, व्यथित होऊन सारखं विचारू लागलं ! जीवन जगले नसताना, किंबहुना ते कसे जगायचे हे पूर्णपणे उमगले नसताना ते संपवावे असे का वाटले आणि ते कसे संपवावे हे ही मुलं न सांगता शिकलीसुद्धा! या उद्विग्न निर्णयाप्रत ही मुलं एकदम पोहोचली का? कदापि शक्य नाही ते !!

विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांत मानव संसाधन विभागात काम करताना आम्ही नेहमी सर्व विभागप्रमुखांना हे शिकवितो की एखादा कर्मचारी अचानक कधीही कंपनी सोडत नाही. आधी त्याची मानसिकता (मग ती कोणत्याही कारणासाठी असो) तयार होते आणि मग ती काही दिवस / महिन्यांत निर्णयात्मक स्थितीत पोहोचते आणि एखाद्या जागरूक विभागप्रमुखास त्या कर्मचाऱ्याची अवस्था / मानसिकता तत्काळ ओळखता येते आणि तो लगेच तो कर्मचारी सोडून जाऊ नये यासाठीचे प्रयत्न सुरू करतो. 

माझ्या मते, अगदी अशीच काही अवस्था या निष्पाप मुलांची होत असणार. ती जेव्हा अशा उद्विग्न अवस्थेत असतात तेव्हा नक्कीच त्यांच्या दिनचर्येत / वर्तनात फरक पडतो. नेहमी चिडचिड करणारी मुले शांततेने वागू लागतात आणि अगदी विरुध्द म्हणजे शांत स्वभावाचे मुले रागराग करू लागतात. या मोठ्या बदलाशिवाय अनेक छोटे बदल जसे की- जेवणातील बदल, झोपेची अनियमितता, अलिप्तपणा आदी प्रकर्षाने घडू लागतात आणि या सर्व गोष्टी घडताना आम्ही पालक असतो कुठे? आमचं आमच्या मुलांकडे खरंच लक्ष असतं का? त्यांच्यातील बदल आम्ही वेळीच का टिपू शकत नाही?

मीही एक पालक आहे आणि त्या भावनेतूनच माझे विचार व्यक्त करीत आहे. आमच्याही घरात १० ते २२ वर्ष अशा वयोगटातील मुले आहेत आणि त्यांचे संगोपन म्हणजे आम्हा सर्वांसमोरील एक मोठे आव्हान आहे. आम्ही घडलो तसेच आपले मुले घडतील या भ्रमात आपल्याला राहता येणार नाही. सुखसुविधांच्या अभावी आम्ही नाही का चांगले वाढलो? आणि सर्व सुखसुविधा असतानाही आमची मुले का व्यवस्थित घडत नाहीत, या प्रश्नाचे जास्त उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत बसू नये.

सोशल मीडिया आता आपला अविभाज्य भाग होऊन बसला आहे आणि ते आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा करता येणे शक्य नाही. त्यामुळे जेवढे आपण मुलांच्या पूर्णपणे जवळ, तेवढा तो सोशल मीडियाला स्वतःपासून कदाचित दूर ठेवू शकेल. त्यामुळे मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल, याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्यांच्यातील बदल आपल्याला लगेच हेरता येतील व वेळीच आपण त्यांना नकारात्मक अवस्थेतून बाहेर काढणे सहज शक्य होईल.

 

Web Title: Where are we falling short as parents?  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.