कुठे उकाडा, कुठे पावसाचा तडाखा; उष्णतेमुळे अंगाची काहिली होत असताना अनेक ठिकाणी वळीवाचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 06:01 AM2018-04-18T06:01:45+5:302018-04-18T06:01:45+5:30
मुंबई उपनगरात पनवेल डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार सरी बरसल्या. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पाटण तालुक्यातील मणदूर (जि. सातारा) येथे घरावरील छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.
मुंबई/पुणे : मुंबई उपनगरात पनवेल डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार सरी बरसल्या. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पाटण तालुक्यातील मणदूर (जि. सातारा) येथे घरावरील छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.
कोल्हापुरात शिवजयंतीच्या मिरवणुका निघण्याची तयारी सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाल्याने, कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. सांगली जिल्ह्यात वाळवा, शिराळा आणि जत तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. सातारा शहर व परिसरासह पाटण तालुक्यात जोरदार पाऊस झाला.
सोलापुरात बार्शी, करमाळा, माढा आणि पंढरपूर तालुक्याला वळीवाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सिंधुदुर्गमध्ये कणकवलीत
विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. रत्नागिरीमध्ये देवरूख आणि चिपळूण परिसराला वळीवाने झोडपले. साखरपा, बावनदी परिसरातही पाऊस झाला. महाड शहरासह तालुक्यात सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक ठिकाणी घरांची हानी झाली आहे.
चंद्रपूर नव्हे, सूर्यपूर राज्यात सर्वात तप्त शहर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/पुणे : वैशाख वणव्यामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला असून, बहुतांश शहारांचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर होते. मंगळवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४४़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
कोकण, मराठवाडा व विदर्भातील कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे़ वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकरही हैराण झाले आहेत. मुंबईचे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या घरात असले, तरी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे.