साडेतीन हजार कोटी शिवस्मारकास कुठून आणणार ?- राज ठाकरे
By admin | Published: December 26, 2016 04:33 PM2016-12-26T16:33:20+5:302016-12-26T16:38:55+5:30
सत्ताधारी भाजपा सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना साडेतीन हजार कोटी शिवस्मारकसाठी कुठून आणणार ?
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 26 - सत्ताधारी भाजपा सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना साडेतीन हजार कोटी शिवस्मारकसाठी कुठून आणणार ?, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी भाजपा सरकारवर शरसंधान साधलं आहे. सरकार शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये कुठून खर्च करणार आहे. सरकारकडून फक्त शोबाजी सुरू आहे. पुतळे बांधून शिवशाही येत नाही. स्मारकावर खर्च करण्यापेक्षा गड-किल्ले दुरुस्त करा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरून राज्य सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. ते नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, निवडणुकांच्या तोंडावर काही तरी विकासकामांच्या योजनांची घोषणा करण्याचा काँग्रेसवाल्यांचा कित्ता आता भाजपाचे सरकार गिरवत आहे. शिवस्मारक भूमिपूजन सोहळा त्याचे उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी केली. भाजप सरकारकडून फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे. लोकांपुढे आकडे मांडून भूलथापा द्यायचा भाजपा सरकारचा डाव असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. नाशकात 112 कोटींच्या सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी ते येथे आले आहेत. विकासकामांची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे सध्या दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.