दहा कोटींचे ट्री गार्ड गेले कुठे?
By admin | Published: January 7, 2017 03:16 AM2017-01-07T03:16:02+5:302017-01-07T03:16:02+5:30
वसई विरार महापालिकेत झाडे लावणे आणि ट्री गार्ड लावण्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे शिवसेनेने उजेडात आणले
शशी करपे,
वसई- वसई विरार महापालिकेत झाडे लावणे आणि ट्री गार्ड लावण्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे शिवसेनेने उजेडात आणले आहे. लावलेली झाडे मरताहेत आणि ट्री गार्ड चोरीला जातात अशी सावरासावर महापालिकेकडून केली जात असली तरी ठेकेदाराला मात्र महापालिकेने यासाठी दहा कोटीहून अधिक रक्कम अदा देखिल केली आहे.
वसई विरार महापालिका हद्दीत झाडे लावणे आणि त्याला ट्री गार्ड (लोखंडी संरक्षण जाळी) लावण्याच्या कामाचा ठेका मे. हिरावती एंटरप्रायजेस या कंपनीस देण्यात आला आहे. तसा ठेकेदारासोबत दिनांक २१ फेब्रुवारी २०१४ रोजी करारनामा करण्यात आला होता. या ठेकेदारास पन्नास हजार लोखंडी ट्री गार्ड बसवण्याचे उद्दिष्ट आखून देण्यात आले होते. एका लोखंडी ट्री गार्डसाठी २ हजार १०० रुपये एवढा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र लाखो झाडे लावूनही ती मृत पावत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. तसेच ट्री गार्ड नसल्याचे प्रकारही निदर्शनास येत होते. त्यानंतर शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी या झाडांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली तेव्हा लोखंडी ट्री गार्ड लावण्यात आलेल्या क्षेत्रापैकी काही ठिकाणांची पाहणी केली. त्यावेळी वसई-विरार क्षेत्रात जवळपास ७७ टक्के ठिकाणी लोखंडी ट्री गार्ड लावलेच नसल्याची बाब या पाहणीतून समोर आले आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाकडून मिळालेल्या माहितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी केली असता महानगरपालिकेने लोखंडी ट्री गार्डची दिलेली संख्या आणि प्रत्यक्षात जागेवर आढळून आलेल्या ट्री गार्डची संख्या यामध्ये प्रचंडमोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याची तक्रार नगरसेवक गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
वसई विरार परिसरात ४९ हजार ६०० झा़डांना लोखंडी ट्री गार्ड बसवण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यापैकी काही ठिकाणी ९ हजार ६१० लोखंडी ट्री गार्डच्या ठिकाणी पाहणी केली असता प्रत्यक्षात २ हजार १३६ लोखंडी ट्री गार्ड लावल्याचे आढळून आले. म्हणजे जवळपास ७७ टक्के लोखंडी ट्री गार्ड लावल्याचे नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. जर संपूर्ण ४९ हजार ६०० ठिकाणची पाहणी केली तर अधिक धक्कादायक चित्र समोर येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
>अनेक ट्री गार्ड झाडांसह उन्मळून पडले
एकीकडे झाडे मृत आहेत, तसेच ट्री गार्डची संख्यादेखिल कमी असताना ठेकेदार मे . हिरावती एंटरप्रायजेसला २०१४ - १५ ते २०१५ - १६ या वित्तीय वर्षात रुपये १० कोटी ९३ लाख ६८ हजार इतक्या रकमेची देयके अदा करण्यात आली आहेत. मात्र अनेक झाडे ही ट्री गार्ड नसल्याने मृत झाली होती. अनेक झाडांच्या बाजूला ट्री गार्ड उन्मळून पडलेले आहेत.
काही ट्री गार्ड अत्यंत मोडकळीस आलेले आहेत. म्हणजे त्यांचा दर्जा निकृष्ट आहे, असे गावडे यांनी म्हटले आहे. वर्ष २०१४ मध्ये वितरित करण्यात आलेला सुमारे ८० हुन अधिक लोखंडी ट्री गार्डचा साठा नालासोपारा पश्चिमेकडील वाघोली येथे विनावापर पडून असल्याचे आढळून आले.
या संपूर्ण प्रकरणात प्रथमदर्शनी ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संबधीत ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याच्याकडून ही रक्कम वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
>लोखंडी ट्री गार्ड चोरीला गेले असल्यास करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार ठेकेदार मे. हिरावती एंटरप्रायजेस यांनी याप्रकरणी पोलीस प्रशासनास आणि महानगरपालिका प्रशासनास एकाच वेळी कळवणे आवश्यक होते. मात्र तसे केलेले दिसून येत नाही. तसेच महापालिकेमार्फत देखील चोरी अथवा गहाळ झालेल्या लोखंडी ट्री गार्ड संबंधात कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही.
- धनंजय गावडे, शिवसेना नगरसेवक
>महापालिकेने ३ लाख झाडे लावली असून त्यापैकी ८० टक्के झाडे जगली आहेत. जगलेल्या झाडांचेच पैसे ठेकेदाराला देण्यात आले आहेत. काही ठिकाणी ट्री गार्ड चोरीला गेले असून त्यासंंबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. पुरेशी माहिती नसल्याने शिवसेनेकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.
- डॉ. किशोर गवस, उपायुक्त