बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी कुठून आले? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल, कर्जमाफीचे पैसे द्या, अन्यथा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 04:45 AM2017-09-15T04:45:12+5:302017-09-15T04:45:54+5:30
ृशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, मग गुजरातहून निघणा-या बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
मुंबई : शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, मग गुजरातहून निघणा-या बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
राज्यात पेट्रोलच्या दराचा भडका उडालेला असताना त्यावर लोकांनी रोष वक्त करू नये म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १० लाख शेतकरी बोगस असल्याचे विधान केले असावे, असा आरोपही तटकरेंनी केला.
कोंडाणे सिंचन प्रकल्पाची तीन वर्षांपासून चौकशी सुरू आहे. आम्ही त्यासाठी सहकार्य करत आहोत. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यापेक्षा अधिक बोलणार नाही, असे सांगत तटकरे यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.
कर्जमाफी देण्यास दिरंगाई करण्यासाठीच सरकारने आॅनलाइन प्रक्रिया आणल्याचा आरोप करत शेतकºयांच्या खात्यात ताबडतोब रकमा जमा कराव्यात; अन्यथा १ आॅक्टोबरपासून राज्यात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा तटकरे यांनी दिला.
अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, अशा बातम्या येतात मात्र तुमच्या पक्षाकडून त्याचे कोणतेही खंडन केले जात नाही याकडे लक्ष वेधले असता तटकरे म्हणाले, विचारसरणी, ध्येयवाद या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्याच पक्षांत कमी-जास्त प्रमाणात संधीसाधूंची संख्या असते. पण आमच्याकडचे कोणीही तसे नाही असे मी म्हणेन, असा दावाही त्यांनी केला.
आम्ही सत्ता सोडली तेव्हा वीज उत्पादन आणि वीज मागणी यातील तफावत भरून काढली होती. आताच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विजेची टंचाई झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड आॅइलचे दर कमी झाले असताना देशभरात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत देशातील सर्वांत महागडे पेट्रोल विकले जात आहे. हेच का अच्छे दिन, असा सवाल तटकरेंनी केला.