बिबट्या आला कुठून ? गूढ कायम

By admin | Published: January 3, 2015 12:57 AM2015-01-03T00:57:58+5:302015-01-03T00:58:17+5:30

प्रशिक्षण, साधने १५ दिवसांत मिळविणार...

Where did the leopard come from? Mystery remained intact | बिबट्या आला कुठून ? गूढ कायम

बिबट्या आला कुठून ? गूढ कायम

Next

कोल्हापूर : बिबट्या उसाच्या मळ्यातून आला, वाघबिळाकडून आला, कुणी आणून सोडला, की कुणाच्या ताब्यातून तो सुटला, अशा स्वरूपात आज, शुक्रवारी दिवसभर शहरात चर्चा सुरू होती. दोन पथके (टीम) तयार करून वनविभागाने बिबट्याच्या आगमनाची शोधमोहीम सुरू केली; पण त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे रुईकर कॉलनीत काल, गुरुवारी बिबट्या कुठून आला, याचे गूढ कायम राहिले.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काल रुईकर कॉलनीत चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नाने बिबट्याला जेरबंद करण्यात आले. मात्र, त्याला चांदोली अभयारण्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. रुईकर कॉलनीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात बिबट्या आला कुठून, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. आज दिवसभरदेखील बिबट्याच्या आगमनावरून विविध स्वरूपांतील तर्क-वितर्क व्यक्त करीत चर्चा सुरू होती. परिसरातील उसाच्या मळ्यातून आला, वाघबिळाकडून आला असेल, कुणीतरी त्याला पाळले होते त्यांच्या तावडीतून तो सुटला असेल, अशा शक्यता या चर्चेतून व्यक्त केल्या जात होत्या. दरम्यान, वनविभागाने बिबट्याच्या आगमनाचा शोध घेण्यासाठी दोन ते तीनजणांचा समावेश असणारी दोन पथके तयार केली. त्याद्वारे शोधमोहीम सुरू केली. त्यांनी रुईकर कॉलनी परिसरातील बिबट्याने केलेला वावर, तेथील ठशांची पाहणी केली. एका पथकाने वाघबिळाच्या परिसरात पाहणी केल्याचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, परिसरातील उसाचे मळे, शेती, आदी ठिकाणी पाहणी केली जात आहे. बिबट्या पाहिलेल्या काही नागरिकांचे जबाब घेतले आहेत. यातील काहींच्या सांगण्यानुसार तो पाळीव होता की, काय? या दृष्टीनेदेखील तपासणी केली जाणार आहे. लोकप्रबोधनाचा उपक्रम राबविणार आहोत. बिबट्याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी आम्हाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशिक्षण, साधने १५ दिवसांत मिळविणार...
बिबट्या तसेच अन्य स्वरूपातील वन्यप्राणी पकडण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना १५ दिवसांत देणार आहे. शिवाय आवश्यक त्या साधनांनी विभाग सज्ज करणार आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ कार्यालयाला कळविले असून, त्याला वरिष्ठांनी मान्यता दिली असल्याचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ट्रॅँक्युलायझर गन आणि औषधेदेखील आमच्याकडे होती. मात्र, गन चालविण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नव्हते. आता अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच अद्ययावत साधनांसह कोल्हापूर विभाग सज्ज केला जाणार आहे. असे प्रशिक्षण देण्याबाबत नाशिक आणि पुण्यातील उपवनसंरक्षकांशी बोलणे झाले असून, त्यांनी तयारी दाखविली आहे. १५ दिवसांत प्रशिक्षण पूर्ण केले जाईल.
(प्रतिनिधी)

जखमींची प्रकृती स्थिर
काल बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात चौघे जखमी झाले होते. यातील प्रमोद देसाई (रा. विद्या कॉलनी), संजय दुंडाप्पा कांबळे (रा. चांदणेनगर, रुईकर कॉलनी), शाहूपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल संताजी शीलवंत चव्हाण यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची आज उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे आणि वनविभागातील अधिकाऱ्यांनी भेट घेतली. या जखमींची प्रकृती स्थिर आहे.


शिराळा : कोल्हापूर येथे जेरबंद केलेल्या बिबट्याचा चांदोली अभयारण्यात नेताना गुरुवारी (दि. १) मृत्यू झाला होता. तीन-चार दिवसांपासून उपाशी असल्याने आणि नागरिकांनी केलेल्या गोंधळाचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालात व्यक्त करण्यात आली. गुरुवारी रुईकर कॉलनी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करून चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी नेत असताना, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. वनक्षेत्रपाल भरत माने यांनी त्याला तपासले असता, तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. डॉ. सुहास देशपांडे यांनी चांदोली अभयारण्यातील झोळंबीजवळील जनीचा आंबा येथे त्याचे विच्छेदन केले. बिबट्या दोन-चार दिवस उपाशी होता. शिवाय त्याला पकडताना नागरिकांनी मोठा गोंधळ केला. उपासमार आणि गोंधळामुळे बिबट्याचे हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याचे डॉ. देशपांडे यांनी शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. शवविच्छेदनाचे चित्रीकरण केले आहे. त्यानंतर जनीचा आंबा येथे चांदोली राष्ट्रीय उद्यानातच बिबट्याचे दहन करण्यात आले. यापूर्वी १४ सप्टेंबर २०१४ रोजी खेड तालुक्यातील आपनीमेटा येथून चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी आणलेल्या नर जातीच्या बिबट्याचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. (वार्ताहर)

Web Title: Where did the leopard come from? Mystery remained intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.