शिवसेना-मनसे युती अडली कुठे?; याआधी २ वेळा दिला होता प्रस्ताव, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 10:30 AM2023-07-04T10:30:27+5:302023-07-04T10:31:04+5:30
जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
मुंबई – राज्यातील राजकारणात गेल्या ४ वर्षात तिसऱ्यांदा राजकीय भूकंप घडला आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ८ दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षात फूट पडली तशीच फूट आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात आता उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना भवनासमोर एका कार्यकर्त्याने बॅनर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आतातरी एकत्र या असं आवाहन केले होते.
त्यात सोमवारी मनसे नेत्यांच्या बैठकीतही काही वरिष्ठांनी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया असं विनंती केली. मात्र त्यावर राज ठाकरेंनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली. शिवसेना-मनसे युती नेमकी अडली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मी कार्यकर्ता असून राज ठाकरे जे आदेश देतील तसे आम्ही काम करतो. २०१४ आणि २०१७ या दोन्ही वेळेला राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव दिला होता त्यावर उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक पाऊलं उचलले नाही. टाळाटाळ केली गेली. ऐन वेळी समोरून माघार घेतली. हा जुन्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही वस्तूस्थिती आहे. मनसे आणि उबाठा गटाचे शीर्ष नेतृत्व काय विचार करते त्यावर अवलंबून आहे. राज ठाकरे यांनी कालच्या बैठकीत छान विधान केले. राजकीय पक्ष म्हणून सत्ता काबीज करणे हे समजू शकतो पण सत्तापिपासू होणे गैर आहे. युती आणि आघाडी हे गरजेतून घडते असं त्यांनी सांगितले.
तसेच जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. युती होईल का नाही हे दोन्ही बाजूने ठरवले पाहिजे. राजकीय गणित कशी जुळवावी लागतात. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. ठाकरे बंधु एकत्र येतील का हे काळच ठरवेल. जनता व्यक्त होत असते. पुढे काय होईल हे आगामी काळात कळेल असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सूचक विधान केले आहे.