जलयुक्त शिवारचा २० हजार कोटींचा निधी गेला कुठे? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:14 AM2019-05-14T01:14:33+5:302019-05-14T01:17:13+5:30
जलयुक्त शिवारमुळे नेमका कोणता लाभ झाला, याची आडेवारी जाहीर करण्याची मागणी केली.
नागपूर : राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला असताना राज्यातील २२ जिल्ह्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई व गुरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी व बोरवेल आटल्या. भूगर्भातील पाण्याची पातळी दीड ते दोन हजार फुटावर गेली आहे. मग शासनाने जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केलेला निधी गेला कुठे, असा सवाल विधिमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केला. तसेच जलयुक्त शिवारमुळे नेमका कोणता लाभ झाला, याची आडेवारी जाहीर करण्याची मागणी केली.
विदर्भातील दुष्काळग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ अमरावती व नागपूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. सोमवारपासून या दौºयाला सुरुवात केली आहे. दौºयावर रवाना होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार ‘लोकमत’शी बोलत होते. बुलडाणा जिल्ह्यातील ८५ टक्के गावे टंचाईग्रस्त आहेत. जलव्यवस्थापनाची कोणतीही प्रभावी कामे जिल्ह्यात केली गेली, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
काँग्रेसचे पथक पाहणी दौ-यावर
राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे संकट असून दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पथक दुष्काळी भागात गेले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार हे दुष्काळी पाहणी दौरे सुरु करण्यात आले आहेत. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सोमवारपासून हे पाहणी दौरे सुरु झाले, तर मंगळवारपासून इतर विभागात काँग्रेसचे पथक दौºयावर जात आहे.