महाडिकांशी मला तरी कुठे जमवून घ्यायचे आहे ?
By admin | Published: July 28, 2015 01:05 AM2015-07-28T01:05:34+5:302015-07-28T01:23:13+5:30
सतेज पाटील यांचा पलटवार : काळे धंदे लपविण्यासाठीच माझी ढाल
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत माझ्याशी जमणार नाही, असे महाडिक म्हणतात. आम्ही एकदा विषाची परीक्षा घेतली आहे. त्यामुळे विश्वासघाताचे प्रतीक असणाऱ्या महाडिकांशी मला तर कुठे जमवून घ्यायचे आहे..? असा पलटवार माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर केला. भाजपचा आमदार निवडून आणला, असे जाहीरपणे सांगणाऱ्या महाडिकांना काँग्रेस आता तरी जाब विचारेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
रविवारी काँग्रेस समितीत झालेल्या पत्रकार परिषदेत महाडिक यांनी पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. त्यास परदेशातून कोल्हापूर येण्यापूर्वीच पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. महाडिक यांना त्यांच्या ताकदीची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी स्वत:, पुतण्या व मुलगा यांना घेऊन ‘महाडिक विचार मंच’ या नावाखाली महापालिकेची निवडणूक लढवावी कोल्हापूरची सूज्ञ जनता काय निर्णय घेते हे तुमच्या लक्षात येईल, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे, ‘राज्यात युतीचे शासन असताना १९९९ मध्ये जिल्ह्यातून काँग्रेस संपविण्याची वल्गना महाडिक यांनी केली होती परंतु युतीची सत्ता जाऊन पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यावर ते पुन्हा काँग्रेसच्या वळचणीला आले. आता काँग्रेसची सत्ता नाही म्हटल्यावर या पक्षाला बदनाम करून स्वत:चे काळेधंदे वाचविण्यासाठी महाडिक माझी ढाल करून भाजपमध्ये जाण्याच्या विचारात आहेत. काहीही करून सत्तेबरोबर राहायचे अशी वृत्ती असणाऱ्या महाडिकांनी काँग्रेसचे आमदार म्हणून १८ वर्षांत काँग्रेस पक्षासाठी किती निवडणुकीत प्रचार केला..? गत निवडणुकीत स्वत:च्या मेहुण्याचा मुलगा सत्यजित कदम याला काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली पण त्याचा प्रचार ते का करू शकले नाहीत..? ज्यांनी काँग्रेसच्या जिवावर आमदारकी भोगली व आता पुन्हा ते काँग्रेसकडे उमेदवारी मागत आहेत त्या महाडिकांनी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काय केले याचा हिशेब द्यावा. ज्यांच्या घरात तीन पक्षाचे झेंडे आहेत व ज्यांनी प्रत्येकवेळी स्वत:च्या स्वार्थासाठी उगवत्या सूर्याला नमस्कार या वृत्तीने स्वत:चे काळेधंदे लपविण्यासाठी सत्तेत असणाऱ्या पक्षाशी साटेलोटे केले त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, अशी घणाघाती टीका पाटील यांनी केली आहे.
ही कोल्हापूरची फसवणूक नव्हे का..
भाजप-ताराराणी आघाडीच्या घोषणेच्या बैठकीला उपस्थित असणारे त्यांचे कार्यकर्ते आम्ही ताराराणी आघाडीचे पुनरुज्जीवन केले असून आम्ही सर्वजण महाडिकांचे कार्यकर्ते आहोत, असे जाहीरपणे सांगतात. स्वत: काँग्रेसमध्ये, पुतण्या राष्ट्रवादीत, लहान मुलगा भाजपमध्ये आणि आता मोठा मुलगा स्वरुप याला ताराराणी आघाडीचा अध्यक्ष करायचे हे महाडिक यांचे नाटक कळण्याइतपत कोल्हापूरची जनता सूज्ञ आहे.
पी. एन. यांना कुणी पाडले..?
मी पी. एन. पाटील यांना फसविण्याचा प्रश्नच येतो कुठे ? करवीर मतदारसंघात धनंजय महाडिक यांना ३३ हजारांचे मताधिक्य मिळाले. हे धनंजय महाडिक व महाडिक कंपनी पी. एन. यांच्या प्रचारात सक्रिय होती का..? या निवडणुकीत महाडिक यांनी नरकेंना मदत केली. ‘गोकुळ’पुरता पी.एन. यांचा वापर व इतरवेळी नरकेंना मदत, असे दुटप्पी राजकारण महाडिक खेळतात, असा आरोप सतेज पाटील यांनी केला.
तुम्ही कोणता प्रश्न मार्गी लावला ?
थेट पाईपलाईनचा जनतेच्या जिव्हाळ््याचा प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावला. गेल्या पाच वर्षांत पक्षाच्या सत्तेच्या माध्यमातून एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी विकासासाठी मिळवून दिला, पण तुम्ही १८ वर्षांत एक तरी प्रश्न मार्गी लावला का...? विधान परिषदेत शहराच्या विकासाबाबत कधी तोंड उघडले का..नगरसेवकांच्या मतांवर सत्ता भोगली पण शहरासाठी किती निधी आणला, अशी विचारणा सतेज पाटील यांनी केली आहे.
‘एम’ गँगमुळेच कोल्हापूर बदनाम
नाफ्ता प्रकरण, हिंद नगरातील खूनप्रकरण, मटका प्रकरण, पर्ल हॉटेलजवळील जागा बळकावणे, रायगड धाब्याजवळचे वेश्या व्यवसाय प्रकरण, कार्यकर्त्यांची गुंडगिरी अशी प्रकरणे लपविण्यासाठीच महाडिकांनी आजपर्यंत सत्तेत असणाऱ्या पक्षांबरोबर साटेलोटे केले. नाफ्ता भेसळ प्रकरणातील राजन शिंदे याचेशी आपला काही संबंध नाही हे हिंमत असेल तर महाडिकांनी जाहीर करावे. ‘एम’ गँगने कोल्हापूर बदनाम केले आहे.
‘दक्षिणे’त पुन्हा ‘कुस्ती’ होऊ दे का.....?
विधानसभा निवडणुकीत मला सांगून सवरून पाडले, असे महाडिक छाती फुगवून सांगतात, परंतु महाडिकांच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींच्या पुण्याई व भाजपच्या लाटेमुळेच अमल महाडिक आमदार झाले. महाडिकांना स्वत:च्या ताकदीवर एवढा विश्वास असेल तर अमल याला आमदारकीचा राजीनामा द्यायला लावून अपक्ष म्हणून ‘दक्षिण’ची निवडणूक लढवायला लावावे. मी ही अपक्ष म्हणून लढायला तयार आहे. त्यातून महाडिक या नावाला जनतेत काय स्थान आहे हे त्यांना कळून चुकेल. काँग्रेसची आमदारकी भोगणाऱ्या महाडिकांनी मुलास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पाठविले. आता ते काँग्रेसमध्ये ‘भाजपचे हस्तक’ म्हणून काम करत आहेत.