हरवलेल्या मुली जातात कुठे ? राज्यातून दिवसाला 70 हून अधिक तरुणी, महिला होत आहेत बेपत्ता  

By मनीषा म्हात्रे | Published: May 14, 2023 12:49 PM2023-05-14T12:49:00+5:302023-05-14T12:49:50+5:30

केरळमधून 30 हजार महिला बेपत्ता झाल्याचे बोलले जात असताना महाराष्ट्रातील तरुणींच्या मिसिंग मिस्ट्रीचा चिंताजनक प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सन 2020 पासून हरविलेल्या व्यक्तींच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. राज्यातून दिवसाला 70 हून अधिक तरुणी / महिला बेपत्ता होत आहेत. जानेवारी ते मार्च दरम्यान 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या आहेत.

Where do missing girls go More than 70 girls and women are going missing from the state every day | हरवलेल्या मुली जातात कुठे ? राज्यातून दिवसाला 70 हून अधिक तरुणी, महिला होत आहेत बेपत्ता  

हरवलेल्या मुली जातात कुठे ? राज्यातून दिवसाला 70 हून अधिक तरुणी, महिला होत आहेत बेपत्ता  

googlenewsNext


महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात १,६०० मुली बेपत्ता झाल्या तर, फेब्रुवारी महिन्यात १,८१० आणि मार्च महिन्यात सर्वाधिक २,२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढत असून ही चिंताजनक बाब असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, लहान मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्यास पोलिस अपहरणाचा गुन्हा नोंदवत, तपास सुरू करतात. दिवसाला किमान तीन अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडे होत आहे. या मुलींचा सामान्य तपासातून शोध घेण्यासोबतच ऑपरेशन मुस्कानसारखे उपक्रम राबवूनही पोलिस मुलींचा शोध घेत आहेत. मात्र मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

मुंबईतील मुली गेल्या कुठे? -
पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून २,२५८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिकमधून १६१, कोल्हापूर ११४, ठाणे १३३, अहमदनगर १०१, जळगाव ८१ तर सांगलीतून ८२ मुली बेपत्ता झाल्या आहेत.

प्रेम प्रकरण अन् बरंच काही -
बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींचेही प्रमाण अधिक आहे. तसेच, काही प्रकरणात मुली सेक्स रॅकेट तसेच मानवी तस्करीच्या शिकार ठरताना दिसतात. तर, राजस्थान, गुजरातसारख्या काही ठिकाणी अल्पवयीन मुलींची लग्नासाठी तस्करी होण्याच्या घटनाही पोलिसांच्या कारवाईतून वेळोवेळी समोर येताना दिसतात.

गृहविभागाने तातडीने पावले उचलावीत -
दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. यामध्ये सन २०२० पासून महाराष्ट्र हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणे आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही. राज्य महिला आयोगाच्यावतीने गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मुंबईतील हरवलेल्या व्यक्तींच्या विभागांतून वेळोवेळी माहिती घेत असतो. प्रत्येक ठिकाणी मिसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही? मागच्या महिन्यात महिला आयोगाने नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असा एक प्रोग्रामही घेतला. यामध्ये राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. यासंदर्भात गृहविभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे.
- रूपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

Web Title: Where do missing girls go More than 70 girls and women are going missing from the state every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.