कोट्यवधींच्या औषधासाठी अर्भकांची नाळ कुठून मिळते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:27 AM2019-05-20T05:27:47+5:302019-05-20T05:29:01+5:30
‘आॅल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर’चे औषध नियंत्रण विभागाला पत्र
मुंबई : अर्भकांच्या नाळेपासून औषधांची निर्मिती केली जाते. त्याचा वापर वैध आहे की अवैध, याविषयी अनभिज्ञता आहे. त्यामुळे नाळेपासून तयार करण्यात येणाऱ्या औषध प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याविषयी, औषधे तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने नाळ कुठून मिळविली जाते? असे अनेक प्रश्न केंद्रीय औषध नियंत्रण विभागाला आॅल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनने विचारले आहेत. नाळेच्या उपलब्धतेविषयी आॅल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनने पत्राद्वारे औषध नियंत्रण विभागासमोर प्रश्न उपस्थित केला आहे.
केंद्रीय औषध नियंत्रण विभाग या औषध निर्मिती कंपन्या आणि पद्धतींकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बाजारात प्लेसेट्रेक इंजेक्शन उपलब्ध होते. त्यात ह्युमन प्लेसेटा अॅब्स्ट्रॅक वापरात आणतात. ह्युमन प्लेसेंटा अॅब्स्ट्रॅक म्हणजे मानवी नाळेचे सत्त्व. यापासून तयार केलेले इंजेक्शन आणि औषध दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे इंजेक्शन तयार करण्यासाठी मानवी नाळेची मोठी मागणी असते, पण ही नाळ कशी उपलब्ध होते? बाळाच्या जन्मानंतर नाळ औषध कंपन्यांना उपलब्ध होत असेल, तर त्यासाठी प्रसूतिगृहांना नियम निकष आहेत का, असे प्रश्न या पत्राद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत.
तसेच या औषधांसाठी मोठ्या संख्येने मुलांच्या नाळेची गरज आहे, ही उपलब्धता कुठून होते, तसेच एखाद्या प्रसूतिगृहातून बाळाची नाळ एखाद्या कंपनीला दिली जाणार असेल, तर त्या आधी नातेवाइकांची परवानगी घेतली जाते का? घरात प्रसूती झाल्यावर ही नाळ मागण्यासाठी एखादी खासगी औषधी कंपनी घरी येते का? असे अनेक प्रश्न आॅल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनकडून विचारण्यात आले आहेत.
‘कंपन्यांची चौकशी व्हावी’
हल्ली अनेक बाळांना गर्भातच कावीळ होते. कावीळ झालेल्या बाळाची नाळ औषधांमध्ये वापरल्यास, त्या काविळीचा संसर्ग औषध घेणाºया व्यक्तीला होऊ शकतो. या सर्व बाबींवर केंद्रीय औषध नियंत्रण विभागाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी फाउंडेशनकडून प्रश्न विचारण्यात आले आहेत. नाळेपासून औषध तयार करणाºया कंपन्यांची चौकशी व्हावी. मोठ्या संख्येने नाळ उपलब्ध होत असल्यास, या उपलब्ध होण्याचा मार्ग मानवी तस्करी तर नाही ना, याची शहानिशा केली पाहिजे.
- अभय पांडे, अध्यक्ष,
आॅल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशन.