लातूरला आलेले पाणी जाते कुठे ?

By admin | Published: May 7, 2016 02:20 AM2016-05-07T02:20:24+5:302016-05-07T02:20:24+5:30

लातूरला रेल्वेद्वारे आतापर्यंत सुमारे पाच कोटी लीटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

Where does water come from Latur? | लातूरला आलेले पाणी जाते कुठे ?

लातूरला आलेले पाणी जाते कुठे ?

Next

- अतुल कुलकर्णी,  मुंबई
लातूरला रेल्वेद्वारे आतापर्यंत सुमारे पाच कोटी लीटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही नागरिकांनी थेट मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. लातूर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हे पाणी जनतेला मिळत नसल्याचा प्राथमिक अहवाल मुख्य सचिवांकडे आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात पहिल्यांदा एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा केला गेला. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यासाठी विशेष निधी मंजूर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक वर्षे बंद पडलेले जलशुध्दीकरण केंद्र अवघ्या १५ दिवसांत सुरू केले. एवढे करूनही केवळ वाटपातील गोंधळामुळे नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही.
याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर गृह विभागाने पाणी वाटपाबाबतचा अहवाल मागवला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुढील वर्षी लातूर महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे काही नगरसेवकांची लॉबी यात कार्यरत झाली असून, ज्यांनी मते दिली त्यांनाच पाणी द्या, असे राजकारण सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याबाबतही तक्रारी आहेत. रेल्वेने आलेले पाणी विहिरीत सोडल्यानंतर रात्री ते टँकर लॉबीला विकले जात असल्याचे निदर्शनास आले.
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांची तातडीने बदली करण्याच्या सूचना दिल्या असून, येत्या आठवड्यात पालिकेला नवीन आयुक्त मिळण्याची शक्यता आहे. शिवाय जे नगरसेवक दुष्काळात देखील पाण्यावरून राजकारण करीत असतील तर त्यांची कृत्ये उघडकीस आणून त्यांना जनतेसमोर उघडे पाडा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत.

खासगी टँकर पाणी पळवून करतात विक्री ?
रेल्वेने रोज २५ लाख लीटर्स आणि माकणी धरणातून २५ लाख लीटर्स असे ५० लाख लीटर्स पाणी लातूरला मिळते. १०५ टँकर्सद्वारे ते नागरिकांना पुरविण्यात येते. मात्र खासगी टँकर्सद्वारे हे पाणी पळविले जात असून, त्याची विक्री होत असल्याचे समजते.

Web Title: Where does water come from Latur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.