कहाँ गया उसे ढूँड़ो ! मुंब्य्रामध्ये राष्ट्रवादीचे बस स्टॉप शोध अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 01:53 PM2017-12-01T13:53:45+5:302017-12-01T13:58:40+5:30
मुंब्रा भागात टीएमटीची बससेवा सुरु केली आहे. मात्र, बसथांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भात अनेकदा विषय काढूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने कहाँ गया उसे धुँडो, हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले.
ठाणे: मुंब्रा भागात टीएमटीची बससेवा सुरु केली आहे. मात्र, बसथांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भात अनेकदा विषय काढूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने कहाँ गया उसे धुँडो, हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले.
मुंब्रा-कौसा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यानंतर नियमितपणे टीएमटीची बससेवा सुरु करण्यात आली. मात्र, ही बससेवा सुरु झाल्यानंतरही येथील बसथांबे गायब झालेले आहेत. जे बसथांबे होते तेही आता दिसेनासे झाले आहेत. त्या निषेधार्थ आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, सय्यदअली अश्रफ, ऋता आव्हाड, मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शानू पठाण आणि शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी दुर्बीण घेऊन बसस्टॉप शोधण्याचा प्रयत्न केला. कौसा पोलीस चौकीपासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.यावेळी शानू पठाण यांनी कहा गया उसे धुंडो, असे गाणे गायले. या आंदोलनात अनिता किणे, राजन किणे, सिराज डोंगरे, नदीरा सुर्मे, आशरीन राऊत, फरजाना शाकीर शेख, मेराज खान, जफर नोमानी, हसीना अजीज शेख, साजिया अन्सारी, रुपाली गोटे, मोरेश्वर किणे, सुलोचना पाटील, बाबाजी पाटील, सुनिता सातपुते, जमिला खान आदी सहभागी होणार आहेत.
या वेळी शानू पठाण यांनी, सुमारे साडेआठ हजार लोक दररोज टीएमटीने प्रवास करीत असतात. या आधी कौसा ते रेतीबंदर दरम्यान 30 थांबे होते. आता मात्र बसथांबाच दिसत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. मुंब्य्रातील नगरसेवकांनी या संदर्भात महासभेमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी आणि प्रशासन मुंब्य्रातील नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करुन महासभेत आवाज दाबणाऱयांना आम्ही जनसभेत उत्तर देऊ; तसेच, बसथांबे उभारेपर्यंत हे आंदोलन असेच सुरु ठेऊ, असा इशारा शानू पठाण यांनी दिला