कुठे कारंजे, तर कुठे रांगा !
By admin | Published: March 4, 2017 12:55 AM2017-03-04T00:55:25+5:302017-03-04T00:55:25+5:30
फुरसुंगी ग्रामपंचायत हद्दीतील दोन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वेगवेगळी स्थिती पाहण्यास मिळत आहे.
फुरसुंगी : फुरसुंगी ग्रामपंचायत हद्दीतील दोन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वेगवेगळी स्थिती पाहण्यास मिळत आहे. तुकाईदर्शनमधील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या काम सुरू आहे. तेथे पाण्याचे कारंजे उडताना दिसते, तर ढमाळवाडीत पाण्यासाठी रांगा लागत आहेत.
फुरसुंगी परिसरातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. या परिसराला ग्रामपंचायतीकडून पिण्याचे पाणी मिळत नाही. महापालिकेच्या टँकर व काही ठिकाणांहून जाणाऱ्या नळकोंडाळ्यांवर येथील नागरिक अवलंबून आहेत. तुकाईदर्शन परिसरात पालिकेतर्फे पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तेथे दिवसातून एक ते दोन तास पाणी येते. परंतु, ढमाळवाडीत पाणी टँकरनेच येत असते. तर, काही भागातील नागरिक येथील रेल्वेलाईनशेजारी असणाऱ्या नळकोंडाळ्यावर
रांगा लावतात. दुपारी तीनच्या सुमारास येथे पाणी येते. कॅन ठेवून रांगा लावल्या जातात. सायकल, दुचाकी तसेच महिला डोक्यावर भांडी घेऊन पाणी घरी नेतात. (वार्ताहर)
>दक्षता गरजेची
सध्या तुकाईदर्शनमधील अतंर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असताना पाण्याच्या पाईपलाईनचीही दुरुस्ती केली गेली. रस्त्याचे काँक्रिटीकरण करेपर्यंत ही पाईपलाईन उघड्यावरच राहणार आहे. रस्ता खोदल्याने पाईपलाईन पुन्हा जोडण्यात येणार आहे.
सध्या पाण्यासाठी पाईप जोडण्यात येत आहेत; मात्र ते निघाल्यावर पाणी रस्त्यावरून वाहते. पाण्याबाबत नागरिक दक्षता घेत नाही. तर, ढमाळवाडीतील नागरिकांना पाण्याची तासन् तास वाट पाहावी लागते.
पालिकेलगतची गावे महापालिकेत समाविष्ट कधी होणार आणि येथील नागरिकांचे प्रश्न कधी सुटणार, हा प्रश्न येथील नागरिकासमोर आहे.