चांगला हापूस कुठे मिळतो ?

By admin | Published: April 10, 2017 10:31 AM2017-04-10T10:31:11+5:302017-04-10T11:17:04+5:30

शाकाहारी बहुल वस्ती असलेल्या बाजारात म्हणजे मुंबैत घाटकोपर-मुलुंड -सायन -विलेपार्ले हापूस चांगला मिळतो.एपीएमसी बाजारात जाण्याचा अतिउत्साह करण्याची ही वेळ नाही .

Where is the good hapus? | चांगला हापूस कुठे मिळतो ?

चांगला हापूस कुठे मिळतो ?

Next

शाकाहारी बहुल वस्ती असलेल्या बाजारात म्हणजे मुंबैत घाटकोपर-मुलुंड -सायन -विलेपार्ले हापूस चांगला मिळतो.

एपीएमसी बाजारात जाण्याचा अतिउत्साह करण्याची ही वेळ नाही .
तुम्हाला दोघांना आणि आल्या गेल्या एखाद्या पाहुण्याला हिशेबात धरून आठवड्याला एखाद डझन आंबा पुरेसा आहे.
तुमच्या उपनगरातल्या बाजारचे पण पोटभाग आहेत. सायनला आंबा चांगला मिळत असेल पण तेगबहादूर नगर म्हणजे जुन्या कोळवाड्यात आंबा चांगला मिळणार नाही. पार्ल्याच्या पूर्व भागात हापूस उत्तम मिळेल पण जूहू स्किममध्ये तोच हापूस दामदुपटीने महाग मिळेल.
मुलुंड पश्चिमेला उत्तर प्रदेशी लोकांची गर्दी असलेल्या बाजारात आंबा घेण्यापेक्षा पूर्वेला पोंक्षे-फडके -नित्सुरे अशी आडनावे असणार्‍या दुकानदाराकडे आंबा घेणे फारच श्रेयस्कर. हे दुकानदार ग्राहकाशी कडवट -कुत्सीत आवाजात बोलतात पण त्यांच्याकडे आंबा उत्तम मिळतो. भय्ये लोकांकडे आंबा चांगला आंबा मिळत नाही असे काही नाही पण ते व्यापार करत असतात त्यामुळे त्यांच्याकडल्या डझनातल्या बार पैकी आठ हापूस तर चार हापूस सारखे आंबे असतात.
हापूस आणि हापूस सारखा ह्या दोन्हीतल फरक काय ह्या प्रश्नाचे उत्तर बायको आणि बायको सारखी म्हणजे काय अशा प्रतिप्रश्नाने द्यावे लागते.
 
हापूस देवगडचा की रत्नागिरीचा ?
 
 देवगडचा हापूस म्हणजे जुना रत्नागिरीचाच हापूस. जिल्हे बदल आपण केले आहेत आंब्यांनी नाही.
तरी पण सामन्य ज्ञानासाठी म्हणून सांगतो. हापूसची चव ही माती पाण्याप्रमाणे बदलते. तांबड्या कातळावर वाढवलेली खार्‍या वार्‍याला दिवसरात्र तोंड देणार्‍या कलमाची फळे चविला उत्तम असतात. डोंगराच्या उतारवरची कलमे पण चांगली फळे देतात पण त्यांची साल जरा निबर असते.
म्हणजे मी राजापूरचा आणि तुमच्या मातोश्री विजयदुर्गच्या असा विचार केला तर फरक लक्षात तातडीने येणार. असो.
असो. दोन्हीची चव चांगलीच असते.
 
खरेदीची ओपनींग मुव्ह कशी करावी?
कितीही ज्ञानामृताचे पेले प्याले तरी चतुर दुकानदार नवख्या नवर्‍यांना चांगलेच ओळखतात. तरीपण एप्रीलच्या पहील्या पंधरवड्यात आमच्या कडे माणगाव किंवा रोह्याचा उत्तम फळ आलंय ते देतो असे म्हणणारा दुकानदार तद्दन खोटारडा असतो. आंबा दक्षिणेकडून उत्तरेकडे पिकत जातो . आधी रत्नागिरी नंतर रायगड आणि सगळ्यात शेवटी वलसाड -गुजरात.
चिपळूणचा आंबा मे च्या पहील्या हप्त्यात-रोहा अलीबाग त्या पाठोपाठ आणि बाकी सगळे आल्सो रॅन मधले...
 
केमीकलवाला आंबा कसा ओळखायचा ?
 
आंबा व्यापार्‍यावर इंप्रेशन मारण्यासाठी कार्बाईड आणि कलटार ,हथ्था हे शब्द वापरणे म्हणजे लिंक्डइनच्या प्रोफाईलच्या जोरावर नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे. व्यापार्‍याला हे सगळे ऐकवणारी चाळीस माणसं दिवसभरात भेटतात. एकतर आता कार्बाईड कोणी वापरत नाही. हथ्थ्याचा संबंध आंब्याशी नसून फक्त सौद्याशी आहे हे आपल्याला कळत नाही आणि कलटार हे ब्रँड नेम आहे हे कलटार म्हणणार्‍या ग्राहकाला माहीती नाही हे त्या (धूर्त) व्यापार्‍याला पक्के माहीती असते. तस्मात काहीही सोंग न घेता डझनभर आंबे घ्यावे आणि घरी यावे.
 
एकदम पाच डझनाची पेटी घ्यायची का ?
 
पाच डझनाची पेटी घेणे हा अव्यापारेषु व्यापार आहे. आंब्याचा भाव बाजारात आल्या दिवसापासून उतरतच असतो.म्हणजे उतरत्या भावाच फायदा पाच आठवडे विसरायचा . हे पाच आठवडे संपता संपता उत्साहच संपला असतो. त्याखेरीज पेटी उघडा , गवत अंथरा , आंबे मांडून ठेवा त्यांच्यावर गस्त घाला अशी कामे वाढतात हे वेगळेच..
हे सगळं ऐकल्यावर चिरंजीव तुमच्या लक्षात आलं असेलच की पिशवी संप्रदायाची रिकामी पिशवी पण वजनदार असते.
मग लोकोत्तर पुरुषाने करायचे तरी काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर मी मोजकी पाच लक्षणे सांगतो ती लक्षात ठेवा,.
१ हापूस आकाराच्या मानाने वजनदार असावा. कलटार प्राशन केलेल्या झाडाचा आंबा हलका लागतो.
२ आंब्याच्या पोटात पिकण्याची क्रिया चालू असते ,त्यामुळे आंबा हातात धरला की उबदार लागतो.
३ नाकावर आपटलेला आंबा घेऊ नये किंवा गोलाकार आंबा घेऊ नये.
४ नाकाजवळ नेऊन सुगंध घेतला तर तो एक सारखा यावा . त्यात उग्र अशी सेकंड नोट आली तर आंबा नि:संशय कमअस्सल आहे असे समजावे. पण हे तंत्र जमेपर्यंत दुसरा पाळणा घरात हलण्याइतका कालावधी जातो.
५ आंब्याच्या देठाचे निरीक्षण करावे. देठाजवळ पांढर्री बुरशी दिसली किंवा बारीक छिद्रे दिसली तर आंबा जागच्या जागी ठेवून दुकानातुन बाहेर पडावे.
 
 (मिसळपाव डॉट कॉम या वेबसाईटच्या सौैजन्याने)

Web Title: Where is the good hapus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.