कुठे उष्णतेची लाट, तर कुठे पावसाची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:56 AM2019-05-22T05:56:07+5:302019-05-22T05:56:09+5:30
वातावरणात उल्लेखनीय बदल : मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशावर स्थिर
मुंबई : राज्यासह देशाच्या वातावरणात मान्सूनपूर्व बदल नोंदविण्यात येत आहेत. विदर्भासह मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असतानाच, उत्तरेकडील काही राज्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशावर स्थिर असून, यापुढेही त्यात विशेष बदल होणार नाही. २२ तसेच २३ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २७ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, २२ मे रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. २३ मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. २४ आणि २५ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असाही इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दुसरीकडे स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची, तर पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान व पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये धुळीच्या वादळासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य भारतात, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये हवामान कोरडे राहील. गुजरात, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील. बिहार आणि झारखंडमध्ये पाऊस पडेल. तेलंगणात उष्णतेची लाट येईल.
रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाऊस पडेल. २२ आणि २३ मे रोजी पंजाब आणि हरयाणामध्ये बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील. वारे वेगाने वाहतील. वाढलेल्या तापमान आणि उष्णतेमुळे काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
राज्यातील शहरांचे
मंगळवारचे कमाल तापमान
नांदेड ४४.५, सांगली ४१.४, मालेगाव ४३.८, पुणे ४१.१, सोलापूर ४५, सातारा ४१.९, सांताक्रुझ ३४, नाशिक ४०.१, चिखलठाणा ४२.६, परभणी ४५.६
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)