आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 02:22 PM2024-07-10T14:22:57+5:302024-07-10T14:24:07+5:30

अभिनेते जयवंत वाडकर हे वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा या महिलेचे काका आहेत.

Where is Marathi film industry gone now? Sanjay Raut's question on the 'Worli hit and run' case | आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut on Worli Hit and Run : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात दोन दिवसांनी आरोपी मिहीर शाहला विरार येथून अटक करण्यात आली आहे. मिहीर हा शिवसेनेचे उपनेते आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचा मुलगा आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मिहीरची आई आणि दोन मोठ्या बहिणींनाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना, सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. 

मिहीरने वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा नावाच्या महिलेला रविवारी(दि.7) सकाळी 5.25 वाजता त्याच्या आलिशान कारने उडवले आणि सुमारे दोन किलोमीटर फरफटत नेले. या घटनेत कावेरी यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अभिनेते जयवंत वाडकर त्या महिलेचे सख्ये काका आहेत. मराठी इंडस्ट्रीतील सहकलाकाराच्या जवळच्या नातेवाईकाचा अशा पद्धतीने मृत्यू होतो, पण इंडस्ट्रीतून कुणी याबाबत काही बोलत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

काय म्हणाले संजय राऊत?
याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणतात, 'राज्यातले सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालत आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात हेच झाले. या मुलाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केली पाहिजे. हिट अँड रन प्रकरणात ज्या महिलेचा मृत्यू झाला, त्या मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नातेवाईक आहेत. आता कुठे गेली मराठी इंडस्ट्री? एरव्ही आपले कमेंट्स देत असतात. त्यांनी यावर बोलले पाहिजे. कसला टाळकुटेपणा ही मराठी इंडस्ट्री करतेय? आपल्या मराठी इंडस्ट्रीतील एका सहकाऱ्याचे नातेवाईक अशाप्रकारे रस्त्यावर चिरडले गेले आहेत आणि तुम्ही मूक गिळून गप्प आहात,' अशा शब्दांत त्यांनी टीका मराठी सेलेब्रिटींवर टीका केली.

आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न
राऊत पुढे म्हणाले, हे प्रकरण साधे नाही, सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसे पुणे प्रकरणात अग्रवाल फॅमिली आहे, तशीच इथे ही फॅमिली आहे. मुलाच्या बापाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासा. पोलिसांकडे तो नसेल, तर आम्ही देऊ. कोणत्या अंडरवर्ल्डशी याचा संबंध आहे, तो काय करतो, त्याची प्रॉपर्टी किती आहे, एवढ्या मोठ्या कार कुठून येतात,  याचा तपास मुंबई पोलिसांनी करावा, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस
हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला. याचा संबंध अंडरवर्ल्ड गँगशी आहे. बोरिवली पोलीस ठाण्यात जाऊन त्याचा रेकॉर्ड तपासा. मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करतो की, त्याचा रेकॉर्ड समोर आणा. एकनाथ शिंदेंसोबत कोणत्या प्रकारची लोक बसली आहेत हे कळेल. कार चालवणारा आरोपी ड्रग्जच्या नशेत होता आणि ही नशा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये, यासाठी तीन दिवसांसाठी त्याला फरार केले आणि नंतर अटक करण्यात आली, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. 

Web Title: Where is Marathi film industry gone now? Sanjay Raut's question on the 'Worli hit and run' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.