पाऊस कुठे अडला ?
By admin | Published: June 24, 2014 01:08 AM2014-06-24T01:08:03+5:302014-06-24T01:08:03+5:30
जून महिना संपत आला तरी सक्रिय होऊनही मान्सून न बरसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. १ ते २३ जून दरम्यान सरासरी १४७.३३ मि.मी. पाऊस पडायला हवा होता.
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी: निम्मा पाऊसही नाही
नागपूर: जून महिना संपत आला तरी सक्रिय होऊनही मान्सून न बरसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. १ ते २३ जून दरम्यान सरासरी १४७.३३ मि.मी. पाऊस पडायला हवा होता. प्रत्यक्षात ६४.११ मि.मी. पाऊस झाला. पावसाची ही तूट ५६.६१ टक्के आहे.
यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊसही कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने जून महिन्यापूर्वीच वर्तविला होता. मान्सून उशिरा दाखल झाला खरा पण तो दाखल झाल्यावरही बरसत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. एरवी ७ जूनला मान्सून विदर्भात दाखल होतो. गेल्या वर्षी तो वेळेत दाखल झाला होता. आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. यंदा जून महिना संपत आला तरी विदर्भ कोरडाच आहे. खरीप हंगामासाठी शेत जमिनीची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात यामुळे आता आसव येण्याची वेळ आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या मान्सून कुठेच सक्रिय नाही. देशाच्या ईशान्य भागात थोडा पाऊस पडत असला तरी इतर भागात मात्र स्थिती कोरडीच आहे. मध्य भारतात आणि पर्यायाने विदर्भात पाऊस येण्यासाठी बंगालच्या खाडीत अनुकूल परिस्थिती नाही आणि ती नजीकच्या काळात निर्माण होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे पुढचा काळ शेतकरी आणि सर्वसामान्यांच्यादृष्टीने कठीण राहणार आहे.
नागपूर विभागात सर्वसाधारणपणे १ ते २३ जून या दरम्यान १४७.३३ मि.मी. पाऊस पडतो. यावेळी या काळात फक्त ६४.४१ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ५६.६१ टक्के कमी पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात १३९.७९ मि.मी. पैकी ६९.६४ (सरासरीच्या ५० टक्के), वर्धा जिल्ह्यात १३७.७३ मि.मी.च्या तुलनेत ६०.६६ मि.मी. (सरासरीच्या ४४ टक्के), भंडारा जिल्ह्यात १४८.४३ मि.मी.च्या तुलनेत ५४.२९ मि.मी.(सरासरीच्या ३७ टक्के), गोंदिया जिल्ह्यात १४८.४३ मि.मी.च्या तुलनेत ८९.६३ मि.मी.(सरासरीच्या ५६ टक्के), चंद्रपूर जिल्ह्यात १४३ मि.मी.च्या तुलनेत ४७.०१ मि.मी. (सरासरीच्या ३३ टक्के) आणि गडचिरोली जिल्ह्यात १५६ मि.मी.च्या तुलनेत ६३,४३ मि.मी. (सरासरीच्या ४१ टक्के) पाऊस झाला आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी झालेल्या पावसामुळे विभागातील धरणांतील जलसाठा समाधानकारक आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर सध्याच परिणाम होण्याची शक्यता नाही. (प्रतिनिधी)