शक्तिपीठ महामार्ग रेटला जाण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमुळे स्पष्ट
By समीर देशपांडे | Published: June 21, 2024 06:51 PM2024-06-21T18:51:28+5:302024-06-21T18:53:33+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा
कोल्हापूर : एकीकडे नागपूर-गोवा जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात तीव्र आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, शुक्रवारी ट्विट करत शक्तिपीठ महामार्गाला ज्या ठिकाणी विरोध आहे तेथे फेरआखणी केली जाईल असे स्पष्ट केल्याने सरकार हा प्रकल्प रेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून पुन्हा वातावरण तापणार असून कोल्हापूर जिल्ह्यात मंत्र्यांना बंदी घालण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने दिला आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ विरोधात मोर्चे निघाले असून कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग रद्दच करण्याची जोरदार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मंत्री दादा भुसे यांनी या प्रक्लपाला स्थगिती दिल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर स्थगिती नको शक्तीपीठ रद्दच करा अशी मागणी करत लोकप्रतिनिधींनी शासनाला धारेवर धरले. अशातच आता मुख्यमंत्री शिंदे यांचे ट्विट आगीत तेल ओतणारे ठरले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विट असे म्हटले आहे की, हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृध्दी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला. त्यानुसार या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का, याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही.
दरम्यान, यानंतर आता संघर्ष समिती आक्रमक झाली असून मंत्र्याना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी करणार असल्याची घोषणा कॉ. गिरीश फोंडे यांनी केली आहे. हे सरकार पाडण्यासाठीच प्रयत्न करणे हाच यावरचा उपाय असल्याचेही त्यांनी आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.