नारायण राणेंना वॉरंट न दाखवता अटक केली तेव्हा कुठं होता कायदा? राष्ट्रवादीला भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 12:22 AM2021-09-02T00:22:37+5:302021-09-02T00:23:18+5:30
अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या जावयाचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र आता यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे. देशात कायद्याचं राज्य आहे की केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे अशी टीका मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रविण दरेकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप नवाब मलिक करतात. पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे(Narayan Rane) साहेबांना वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? नवाब मलिक, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट अशा शब्दात दरेकरांनी मलिकांना फटकारलं आहे.
पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे साहेबांना अटक वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? @nawabmalikncp जी, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट....
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 1, 2021
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वैदी यांचं अपहरण; कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप
काय म्हणाले होते नवाब मलिक?
या देशात कायद्याचं राज्य आहे की, केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आणि वकीलांना काही लोकांनी बुधवारी संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांची मुलगी, सुन, जावई आणि वकील वरळी येथील निवासस्थानाबाहेर येत असताना अचानक दहा -बारा जणांनी त्यांची गाडी अडवून वकील व जावई यांना ताब्यात घेतले आणि सोबत घेऊन गेले आहेत. याबाबत कुठलीही माहिती मुलीला किंवा त्यांच्या सुनेला दिलेली नाही असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. एकंदरीत ही सर्व कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नाही त्यामुळे सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली होती.
एकंदरीत ही सगळी कारवाई बेकायदेशीर व कुठलेही नियम किंवा प्रोसिजरला धरून नाही. प्रश्न निर्माण होत आहे की या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे की राज्यकर्त्यांचा नवीन कायदा या देशात लागू झालेला आहे, याचा खुलासा सीबीआयने केला पाहिजे.
— NCP (@NCPspeaks) September 1, 2021
- @nawabmalikncp
मुख्य प्रवक्ते
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख यांच्या वरळी निवासस्थानाबाहेर ८ ते १० लोकांनी जावई गौरव चतुर्वैदी यांना एका गाडीत बसवून निघून गेले. याबाबत राहत देशमुख म्हणाल्या की, आमच्या घराबाहेरुन वकील आणि दाजी यांना ८ ते १० लोकांनी गाडीत बसवून घेऊन गेले. ते कुठे गेले, काही फोन कॉल्स नाही. आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडल्याचं राहत देशमुख यांनी सांगितले आहे.
गौरव चतुर्वैदी यांना कुणी ताब्यात घेतलंय याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. सफेद रंगाची इनोव्हा गाडी असल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. कुठलीही नोटीस न देता अशाप्रकारे अज्ञातांनी गाडीत बसवून घेऊन गेले. त्यामुळे अनिल देशमुख कुटुंबाने वरळी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. गौरव चतुर्वैदी हे अनिल देशमुखांचे जावई आहे. ईडी(ED), सीबीआयकडून(CBI) त्यांना ताब्यात घेतलं असावं अशी शक्यता आहे. परंतु कुठलीही माहिती न देता अशाप्रकारे कारवाई करणं योग्य आहे का? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर ईडी, सीबीआयनं ताब्यात घेतलं असेल तर आम्ही त्यावर कायदेशीर उत्तर देऊ असं अनिल देशमुख कुटुंबीयांनी सांगितले आहे.