'आमचं सरकार होतं तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं..? जनतेने आता हुशार व्हावं'- महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 12:33 PM2021-11-21T12:33:03+5:302021-11-21T12:36:59+5:30
बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी महादेव जानकर यांनी त्यांची भेट घेतली.
बुलडाणा: मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्व एसटीचे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांचा संप संपवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न झाले, पण संपकरी कर्मचारी ऐकायला तयार नाहीत. ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलिनीकरणावर भाष्य करताना भाजपला घरचा आहेर दिला आहे.
भाजपला घरचा आहेर
मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची महादेव जानकर यांनी भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर म्हणाले की, 'आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे विलीनीकरण झालं..? रस्त्यावर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं, असं ते म्हणाले.
रविकांत तुपकर यांचे बुलडाण्यात आंदोलन
शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाण्यात आंदोलन पुकारलंय. महादेव जानकर यांनी बुलडाण्यात जाऊन तुपकर यांची भेट घेतली. रवीकांत तुपकर माझे चांगले मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं. तसेच, तुपकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांना चर्चा करायला बोलावले. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे, म्हणून मी आलो असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.